सावधान, आजपासून हेल्मेट न घालता दुचाकीवर बसल्यास दंड, 3 महिन्यांसाठी निलंबित होणार लायसन्स


मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानुसार मुंबईत गुरुवारपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मोठ्या आवाजात वाहन चालवणाऱ्यांचीही खैर नाही. नुकतेच डीसीपी राज टिळक रोशन यांनी एक अधिसूचना जारी केली होती की, 9 जूनपासून लोकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी. यामध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या स्वारांचाही समावेश असेल. हेल्मेट न घालता वाहतूक पोलिसांनी त्यांना पकडल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, तर 500 रुपयांपर्यंतचा दंडही आकारला जाईल.

गुरुवारपासून हा आदेश महानगरात लागू झाला आहे. वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी, 50 ठिकाणी विशेष वाहतूक चौक्या उभारण्यात आल्या आहेत, जिथे पोलिसांना केवळ वेग मोजणारी यंत्रेच दिली नाहीत, तर ड्रिंक अँड ड्राईव्हवर कारवाई करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक उपकरणेही दिली आहेत. याशिवाय वाहनचालकांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी चालान कापण्यासाठी मशिन आणि अंगावरील कॅमेरे देण्यात आले आहेत.

10,388 वाहनचालकांवर कारवाई
हेल्मेट घालून वाहन चालविण्याच्या या मोहिमेसोबतच, मुंबई पोलीस दर बुधवारी नो हंकिंग डेही राबवतात. दरम्यान, पोलिसांकडून वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी 2765 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव स्थानिक आरटीओकडे पाठवला होता, तर 10388 हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. जॉइंट सीपी राज्यवर्धन सिन्हा यांनी चालक आणि स्वारांना हेल्मेट घालूनच वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.