पाकिस्तानमध्ये वीज संकट, रात्री १० नंतर विवाह कार्यक्रम बंदी

बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत असलेल्या पाकिस्तानी सरकारला आणखी एक कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून वीज बचत करण्यासाठी देशभरातील सर्व बाजार रात्री साडेआठ वाजताच बंद केले जाणार आहेत. इस्लामाबाद शहरात रात्री १० नंतर विवाह कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. चारी प्रांतांचे मुख्यमंत्री या बैठकीला हजर होते आणि त्यांनी रात्री बाजार लवकर बंद करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली असे समजते.

पाकिस्तानचे वीज मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले देशात वीज संकट अधिक गहिरे झाले आहे. त्यामुळे बाजार लवकर बंद करणे आणि वर्क फ्रॉम होम मुळे वीज बचतीचा प्रयत्न केला जात आहे. देशात सध्या २२ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे मात्र प्रत्यक्षात गरज २६ हजार मेगावॉटची आहे. त्यामुळे वीज कपात करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. औद्योगिक विभागासाठी वीज कपात केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

पाकिस्तान अगोदरच चीन, सौदी, युएई व जागतिक बँकेकडून घेतलेल्या प्रचंड कर्जाखाली दबला असून भारताशी शत्रुत्व आणि करोना मुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बिकट झाली आहे. जुन्या कर्जावरील व्याज देण्यासाठी पाकिस्तानाला नवे कर्ज घ्यावे लागते आहे असे समजते.