पुढच्या सहा महिन्यात ८६ टक्के भारतीय नोकरदार देणार राजीनामे
देशात एकीकडे बेरोजगारी वाढत आहे आणि करोना मुळे गेल्या दोन वर्षात राजीनामा देणाऱ्या कर्मचार्यांची संख्या वाढताना दिसली आहे त्या पार्श्वभूमीवर रिक्रुमेंट एजन्सी मायकल पेज चा नवा रिपोर्ट विशेष चर्चेचा ठरला आहे. या रिपोर्ट नुसार आगामी सहा महिन्यात भारतात ८६ टक्के कर्मचारी नोकरीचा राजीनामा देतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या अहवालात ६१ टक्के नोकरदार आयुष्य आणि करियर यात संतुलन राखण्यासाठी कमी पगारावर नोकरी करण्यास तयार असल्याचेही नमूद केले गेले आहे.
‘ द ग्रेट एक्स’ नावाने हा रिपोर्ट सादर केला गेला आहे. यातील डेटानुसार करोना काळात सुरु झालेला नोकरी सोडण्याचा ट्रेंड अजूनही सुरूच आहे. उलट या वर्षात हा वेग वाढला आहे. बाजार, उद्योग, व्यापार अश्या सर्व पातळ्यांवर व सर्व वयोगटात हा ट्रेंड दिसून येत आहे. ११ टक्के नोकरदारांनी अगोदरच राजीनामे दिले आहेत. यामागे करिअर मधील संथ प्रगती, नोकरीतील रोल, जास्त पगार, पद बदल अशी काही मुख्य कारणे समोर आली आहेत. वर्क फ्रॉम होम, कोविड नियम पालन या विषयी कर्मचारी आणि कंपन्या याच्यात वाद सुरु आहेत. काही जणांना वर्क फ्रॉम होम सिस्टीम योग्य वाटत असली तरी ११ टक्के त्या विरोधात आहेत आणि त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात १२ देशात सर्व्हेक्षण केले गेले असून भारतात आहे ती नोकरी सोडण्याचा विचार असलेले कर्मचारी सर्वाधिक संख्येने आहेत. त्या पाठोपाठ इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांचा नंबर आहे.