झूम कॉलवरून ९०० जणांना बेरोजगार करणारे विशाल गर्ग कायद्याच्या कचाट्यात
गतवर्षी झूम कॉलवरूनच ९०० कर्मचार्यांना एका झटक्यात नोकरीवरून कमी करून घरी पाठविणारे अमरिकन ऑनलाईन कर्ज कंपनी, ‘बेटर डॉट कॉम’चे सीईओ विशाल गर्ग कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. बेटर डॉट कॉमच्या सेल्स अँड ऑपरेशन विभागाच्या माजी उपाध्यक्ष सारा पीयर्स यांनी गर्ग यांच्याविरोधात गुंतवणूकदरांची दिशाभूल केल्यासंदर्भात न्यूयॉर्क युएस डीस्ट्रीक्ट न्यायालयात केस दाखल केली आहे. गर्ग हे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत.
सारा यांनी दाखल केलेल्या केस मध्ये विशाल गर्ग यांनी कंपनीचे गुंतवणूकदार कायम राहावेत यासाठी कंपनीचा व्यवसाय आणि होत असलेली भरभराट याविषयी चुकीच्या पद्धतीने माहिती दिल्याचे म्हटले आहे. मे मध्ये एका कंपनीचे विलीनीकरण करून बेटर डॉट कॉमने त्या संदर्भात गुंतवणूकदरांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे सारा यांनी समोर आणताच त्यांना फेब्रुवारी मध्ये नोकरीवरून कमी केले गेले होते. बेटर डॉट कॉमची स्थापना न्यूयॉर्क मध्ये २०१६ साली झाली असून घरमालकाना ऑनलाईन कर्ज व विमा उत्पादने विकण्याचे काम ही कंपनी करते.
करोना काळात गतवर्षी गर्ग यांनी झूम मीटिंग घेऊन ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते त्यात भारतातील कर्मचारी सुद्धा सामील आहेत. त्याविरोधात खूपच गदारोळ झाला, त्यानंतर गर्ग यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती.