मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; धान्यांच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ


नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये सांगितले की, सरकारने 2022-23 या वर्षासाठी विविध खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. 2022-23 या वर्षासाठी खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये आता वाढ होणार आहे.

ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले, की मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी खरीप पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, 2022 चा नैऋत्य मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या तीन वर्षांत सामान्यपेक्षा चांगल्या पावसाने खरीप अन्नधान्य उत्पादनात सरासरी 2.8 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि त्यामुळे खरीप उत्पादनात 2.5 टक्के वाढ होऊ शकते, तर रब्बी उत्पादनात 1.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

14 खरीप पिकांच्या एमएसपीला मान्यता
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या एमएसपीला मंजुरी देण्यात आली. 2022-23 पीक वर्षासाठी खरीप पिकांच्या सामान्य जातीचा एमएसपी गेल्या वर्षीच्या 1,940 रुपये वरून 2,040 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

‘अ’ दर्जाच्या खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत झाली वाढ
‘अ’ दर्जाच्या धानाच्या आधारभूत किंमतीत 1,960 रुपयांवरून 2,060 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भात हे खरीपाचे मुख्य पीक असून, पेरणीला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने जून-सप्टेंबर या कालावधीत सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात सुरू केलेल्या अनेक कार्यक्रमांवरही भर दिला आहे.