पलामू – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी झारखंडच्या पलामू कोर्टात 2009 च्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी हजेरी लावली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने लालू यादव यांना 6000 रुपयांचा दंड ठोठावला. 2009 च्या निवडणूक प्रचारादरम्यान लालू यादव यांच्यावर हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवल्याचा आरोप होता. निवडणूक आयोगाने लालूंचे हे पाऊल आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले होते आणि एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी न्यायालयाने लालूंना हजर राहण्याची शेवटची नोटीस दिली होती.
लालू यादव यांना सहा हजारांचा दंड, 13 वर्षे जुन्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय
लालू खटल्यातून निर्दोष : वकील
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लालू प्रसाद यांचे वकील धीरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, खंडपीठाने सर्व मुद्दे ऐकून घेतले आणि दोन्ही पक्षांच्या याचिकेवर विचार केल्यानंतर, 6,000 रुपयांचा दंड घेत त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि खटला बंद केला.
काय आहे प्रकरण?
वास्तविक, 2009 च्या झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान गढवा विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे उमेदवार गिरीनाथ सिंह यांच्या प्रचारासाठी लालू यादव हेलिकॉप्टरने पोहोचले होते. लालूंची सभा गढवा येथील गोविंद हायस्कूलमध्ये होणार होती. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी प्रशासनाने गढवा ब्लॉकमधील कल्याणपूर येथे हेलिपॅड निश्चित केले होते, तर लालूंनी हेलिकॉप्टर रॅलीच्या मैदानातच उतरवले होते. त्यानंतर गदारोळ झाला. या घटनेनंतर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पायलटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेलिकॉप्टर भरकटले : लालूंनी मांडला आपला पक्ष
गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुद्द्यावरून बरेच राजकारण झाले. लालूंच्या बाजूचे लोक म्हणाले की, हेलिकॉप्टर भरकटले होते, तर विरोधकांनी गर्दी जमवण्यासाठी लालूंनी हे सर्व केल्याचे सांगितले.