राळेगणसिद्धी – राजधानी दिल्लीत 2011 साली भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा गरजण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यांनी आपली नवी संघटना ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
अण्णा हजारेंनी केली ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’ या नव्या संघटनेची घोषणा
84 वर्षीय अण्णा हजारे 19 जून रोजी त्यांच्या वाढदिवशी या संघटनेची स्थापना करणार आहेत. अण्णा 19 जून रोजी दिल्लीत येत आहेत. ते येथे त्यांच्या नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही संघटना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहे.
कायद्याच्या दिरंगाईबाबत लोकायुक्तांनी ताकीद दिली होती. याप्रकरणी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र सरकारने ऑगस्टपर्यंत हा कायदा लागू न केल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात येईल, असेही ते म्हणाले. 15 मे रोजी अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले होते.
त्यात ते म्हणाले होते की, देशातील काही राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकायुक्त कायदे अधिसूचित केले आहेत, परंतु महाराष्ट्रात तसे झाले नाही. मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2019 मध्ये मी आंदोलन केले होते, परंतु फडणवीस यांनी मला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यास सरकार तयार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे आंदोलन मागे घेतले. यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत काहीही केले नाही.
महाराष्ट्र सरकारने लोकायुक्त कायदा लागू करावा अन्यथा सत्तेवरून बाजूला व्हावे, असे अण्णांनी पत्रात म्हटले होते. लोकायुक्त कायद्याच्या बाजूने आंदोलन करण्यासाठी राज्यातील 200 तालुक्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.