‘टूर ऑफ ड्युटी’ संदर्भात पंतप्रधान करणार घोषणा

भारत सरकारने सेना भरती साठी नवी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याला ‘टूर ऑफ ड्युटी’ असे नाव दिले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भातील घोषणा आज करणार आहेत असे समजते. बुधवारी म्हणजे आज सेनेच्या तिन्ही दल प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषद होत असून त्यात हि घोषणा केली जाईल असे सांगितले जात आहे.

अग्निपथ किंवा टूर ऑफ ड्युटी योजनेनुसार तिन्ही सेना दलात इच्छुक उमेदवारांना चार वर्षासाठी भरती होता येणार आहे. या कालावधीसाठी भरती झालेल्या सैनिकांना चार वर्षानंतर १०० टक्के सेवा मुक्त केले जाणार असून त्यांना निवृत्ती वेतन नाही पण एकरकमी निवृत्ती रक्कम दिली जाणार आहे. नंतर पुन्हा यातील २५ टक्के सैनिकांना पूर्ण सेवा काळासाठी पुन्हा भरती करून घेतले जाणार आहे. यापूर्वी हा प्रस्ताव तीन वर्षासाठी होता आणि ३ वर्षानंतर काही जणांना, तर पाच वर्षानंतर आणखी काही जणांना निवृत्त करून २५ टक्के उमेदवारांना कायम नोकरीत सामावून घेतले जाणार होते. आता नव्या योजनेनुसार चार वर्षानंतर १०० टक्के उमेदवारांना निवृत्ती देऊन ३० दिवसानंतर २५ टक्के उमेदवारांना पुन्हा सैन्यात सामावून घेतले जाणार आहे.

यासाठी जवान म्हणून भरती होणार्यांसाठी वय मर्यादा साडे सतरा ते २१ आणि अधिकारी वर्गासाठी २१ ते ३४ अशी आहे. जवानाना या काळात महिना ३० ते ४० हजार तर अधिकाऱ्यांना ८० ते ९० हजार वेतन मिळणार आहे. सेना दलात सध्या ७५०० जागा रिक्त आहेत. उमेदवार अविवाहित असणे बंधनकारक आहे.