आकाशात २४ जूनला होतेय ‘प्लॅनेट परेड’

आकाश दर्शनाची आवड असलेल्या खगोलप्रेमींसाठी २४ जून रोजी केवळ १ तासभर एक अनोखा नजारा पाहण्याचा योग येत आहे. या दिवशी पाच ग्रह एकाच ओळीत येणार आहेत.  दोन किंवा तीन ग्रह एका रांगेत येण्याची घटना फारशी दुर्मिळ नाही मात्र पाच ग्रह एका रांगेत येणे हा तसा दुर्मिळ योग आहे. बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनी २४ जूनला पहाटे एका रांगेत दिसणार आहेत. या घटनेला ‘प्लॅनेट परेड’ असे म्हटले जाते. अर्थात हे वैज्ञानिक नाव नाही.

या दिवशी सकाळी उत्तर गोलार्धात दक्षिण पूर्व दिशेला तर दक्षिण गोलार्धात उत्तर पूर्व दिशेला हा अनोखा नजारा दिसणार आहे. फक्त १ तासासाठीच हे दृष्य पाहता येणार आहे. बुध यावेळी दुर्बिणीतून सहज दिसेल. या वेळी चंद्र, मंगळ आणि शुक्र ग्रहांच्या मध्ये असेल आणि तो अर्धचंद्र असेल. यापूर्वी २००४ मध्ये पाच ग्रह एका सरळ रेषेत दिसले होते. आता २४ जून २०२२ नंतर पुन्हा हा योग २०४० साली येणार आहे असे सांगितले जात आहे.