विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर असलेला क्रिकेटर म्हणून इतिहास रचला आहे. त्याच्या इन्स्टावरील फॉलोअर्सची संख्या २० कोटींवर गेली असून अशी कामगिरी बजावणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. ३३ वर्षीय विराट सर्वाधिक फॉलोअर असलेल्या खेळाडूंच्या यादीत आता ३ नंबरवर आला असून पहिल्या नंबरवर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर रोनाल्डो (४५ कोटी) तर दोन नंबरबर आर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सी (३३ कोटी ३० लाख) फॉलोअर आहे.
विराटने त्याच्या या कामगिरीबद्दल त्याच्या फॉलोअर्सना धन्यवाद दिले आहेत. २०२१ मध्ये युएई येथे झालेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप नंतर विराटने टीम इंडियाची कप्तानी सोडली होती. आयपीएल २०२२ मध्येही विराटची बॅट फारशी तळपली नाही. त्याने या स्पर्धेत १६ सामन्यात २२.७३ च्या सरासरीने ३४१ रन्स काढल्या त्यात दोन अर्धशतके आहेत.
विराटने भारतासाठी खेळताना १०१ टेस्ट मध्ये ८०४३ धावा, २६० वन डे मध्ये १२३११ धावा त्यात ४३ शतके, आणि ९७ टी २० मध्ये ३२९६ धावा काढल्या आहेत. आगामी द. आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या टी २० सिरीज साठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे.