युरोपिय संघाच्या नव्या कायद्याचा अॅपलला बसणार दणका

युरोपीय संघ आणि संपूर्ण युरोप मध्ये सर्व स्मार्टफोन व टॅब्लेटस साठी एकाच चार्जरचा वापर करण्याबाबतचे धोरण ठरविले गेले असून या संदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला मंगळवारी युरोपीय संघ आणि संसदेने मंजुरी दिली आहे. हा कायदा बनला तर २०२४ अखेर पासून सर्व डिव्हायसेस साठी युएसबी सी टाईप चार्जरचा वापर केला जाणार आहे. यामुळे ४५ कोटी नागरिकांना एकसारखे चार्जर वापरता येणार आहेत. परिणामी ११ हजार टन इलेक्ट्रोनिक कचरा कमी होणार आहे शिवाय पैशांची मोठी बचत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या अॅपल लायटनिंग, मायक्रो युएसबी आणि युएसबी सी टाईपचा वापर डिव्हायसेस चार्ज करण्यासाठी होतो. मात्र त्यातील युएसबी सी टाईप अधिक सुलभ व वेगवान आहे असा निष्कर्ष युरोपीय संघाने काढला आहे. त्यामुळे याच टाईपचे चार्जर युरोपीय देशात या पुढे वापरणे कायद्याने बंधनकारक होणार आहे. याचा सर्वात मोठा फटका अॅपल स्मार्टफोन आणि अन्य डिव्हायसेस विक्रीला बसणार आहे. अॅपल उपकरणे चार्ज करण्यासाठीचे चार्जर वेगळे आहेतच पण ते महागही आहेत. यामुळे युरोप मध्ये नवा कायदा लागू झाला तर अॅपल ला उत्पादने विक्री करताना कनेक्टर बदलावा लागणार आहे.

युरोपीय देशांच्या मते सध्या दरवर्षी युजर्स सुमारे २१,७४० कोटींची रक्कम चार्जर खरेदीवर खर्च करतात कारण सर्व उपकरणांना चालू शकेल असा कॉमन चार्जर नाही. शिवाय वायरलेस चार्जिंग या नव्या तंत्रज्ञानाला या नव्या कायद्यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल असेही सांगितले जात आहे.