भूकंपात दबलेली माणसे शोधण्यास मदत करणार ‘ हिरो रॅटस’
भूकंपात माती दगडाखाली अडकलेल्या माणसांशी संपर्क स्थापून त्यांना जिवंत बाहेर काढण्यासाठी उंदरांची एका फौज विशेष प्रशिक्षण देऊन तयार केली जात आहे. आफ्रिकेतील वैज्ञानिक आणि अपोपो नावाची एक एनजीओ या उंदरांना प्रशिक्षण देत असून त्यांना ‘हिरो रॅटस’ असे म्हटले जात आहे.उंदीर हा सर्वसामान्य माणसाला उपद्रवी प्राणी वाटतो. पण भयानक भूकंपात अनेकदा माणसे मलब्याखाली दबली जातात आणि त्यांना बाहेर संपर्क करणे अवघड होते तसेच बाहेर मदतीसाठी आलेल्यांना कुठे कोण अडकले आहे हे शोधणे कठीण होते अश्यावेळी हिरो उंदीर फार महत्वाची कामगिरी बजावणार आहेत.
पाठीवर बॅग असलेले हे उंदीर बचाव पथकाची मदत करणार आहेत. डॉ. डोना यांनी असे ७ उंदीर अवघ्या दोन आठवड्याचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत. पाउंच्ड जातीचे हे उंदीर आहेत. या उंदरांच्या पाठीवर असलेल्या बॅगेत मायक्रोफोन, व्हिडीओ उपकरण, लोकेशन ट्रॅकर आहे. त्याच्या मदतीने जमिनीत दबलेल्या लोकांना शोधणे, संपर्क साधणे आणि परिस्थितीची माहिती देणे अशी कामे हे उंदीर करणार आहेत.
या कामासाठी उंदीर निवडण्यामागाचे कारण सांगताना डॉ.डोना म्हणाल्या, उंदरांना प्रशिक्षण देणे सोपे आहेच पण त्यांची वास घेण्याची क्षमता अधिक आहे. उंदीर ६ ते ८ वर्षे जगतात, फारसे आजारी पडत नाहीत, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च कमी होतो आणि छोट्या जागेत जास्त उंदीर ठेवता येतात. कोणत्याही अरुंद जागेत उंदीर सहज प्रवेश करू शकतात. प्रशिक्षित झालेले उंदीर प्रथम तुर्कस्थान मध्ये पाठविले जाणार आहेत कारण तेथे भूकंप होण्याचे प्रमाण जास्त आहे.
उंदीर स्मार्ट असतात, नवी कौशल्ये सहज आत्मसात करतात असे सांगून डॉ. डोना म्हणाल्या, यापूर्वी टीबी आणि बुसिलोसीस रुग्ण केवळ वास घेऊन ओळखण्याचे प्रशिक्षण या जातीच्या उंदरांना दिले गेले होते आणि त्यात ते अतिशय यशस्वी झाले आहेत. अत्तापर्यंत १७० उंदीर प्रशिक्षित केले गेले आहेत.