सिद्धू मुसेवाला हत्याकांड: आठ शूटरची ओळख पटली, पंजाब-हरियाणासह चार राज्यांमध्ये पोलिसांचे छापे


चंदीगड: पंजाब पोलिसांनी सोमवारी सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शूटरच्या ओळखीचा दावा केला. यातील दोन शूटर महाराष्ट्राचे, दोन हरियाणाचे, तीन पंजाबचे आणि एक राजस्थानचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शूटर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे आहेत. या शूटर्सच्या शोधात पंजाब पोलिसांनी संबंधित राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली आहे. पंजाब पोलिस गुंडांच्या शोधात हरियाणा-पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात छापे टाकत आहेत.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसवालाच्या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या हत्येतील आरोपींचा शोध लागला आहे. मारेकरी कोणत्या मार्गाने आले आणि ते कसे पळून गेले? याची सर्व माहिती प्राप्त झाली आहे. तरनतारन येथील मनप्रीत मनू आणि जगरूपसिंग रूपा, भटिंडातील हरकमल उर्फ रानू, सोनीपत येथील प्रियव्रत फौजी आणि मनजीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे, सौरव महाकाल आणि संतोष जाधव आणि राजस्थानमधील सीकर येथील सुभाष बानोदा यांचा समावेश असलेल्या शूटर्सची ओळख पटली आहे. या सर्व शूटर्सची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. याच शूटर्सनी 29 मे रोजी मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची हत्या केल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. हे सर्व शूटर तीन दिवसांपूर्वी कोटकपुरा महामार्गावर जमले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन जणही होते. त्यांचीही ओळख पटवली जात आहे.

फॅन बनून रेकी करणार केकरा अटकेत
सिद्धू मुसेवालाचा फॅन बनून रेकी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी कालनवली, सिरसा येथील संदीप उर्फ ​केकरा याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तो दोन लोकांसह सिद्धूच्या घरी गेला होता. यात त्याचा मित्र निक्कू आणि भटिंडाचा शूटर केशव यांचा समावेश होता. त्यांनी केशवला सिद्धूच्या घरापासून काही अंतरावर सोडले. त्यानंतर निक्कू आणि केकरा चाहते म्हणून मुसेवाला यांच्या घराबाहेर पोहोचले. दोघेही 45 मिनिटे येथे थांबले, चहा घेतला. सिद्धू घराबाहेर आल्यावर केकराने सिद्धूसोबत सेल्फी काढला आणि थारचा फोटोही काढला.

दोघांच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. हे फुटेज हत्येच्या 15 मिनिटांपूर्वीचे आहे. परत येताना, केकराने निक्कू आणि केशव यांना सोडले, ते त्यांच्या इतर साथीदारांसह कोरोला कारमध्ये चढले आणि त्यांची स्वतःची मोटरसायकल घेऊन निघून गेले. पंजाब पोलिसांना संशय आहे की हा केकरा मुसेवालाचा खबरी होता. या केकराला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचे गुन्हेही दाखल आहेत. हा केकरा तख्तमाळ येथील रहिवासी असलेल्या निक्कूचा मित्र आहे. निक्कू हा गुन्हेगार आहे. त्याचे अनेक टोळ्यांशी संबंध आहेत.

मानसा पोलिस अधिकाऱ्यांना धमकी
दरम्यान, मानसातील पोलीस अधिकाऱ्यांना परदेशी क्रमांकावरून फोन करून धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी सांगितले की, कॉलरने पोलिस अधिकाऱ्यांना गुंडांवर छापे टाकणे थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा असे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. तसेच, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

खुनाच्या गुन्ह्यातील फरार शूटर आहे पुण्याचा
आठ शूटर्सपैकी संतोष जाधव हा पुण्याचा रहिवासी आहे. पुण्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एका खुनात त्याचा सहभाग होता. तेव्हापासून तो फरार आहे.