Gupta Brothers Arrested: सहारनपूरच्या गुप्ता बंधूंना UAE मध्ये अटक, आफ्रिकेत केला भ्रष्टाचार


नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचे निकटवर्तीय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या गुप्ता बंधूंना संयुक्त अरब अमिरातीतून अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने सोमवारी याची पुष्टी केली. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता या दोन्ही भावांना अटक करण्यात आल्याचे सांगितले.

यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुप्ता बंधूंना परत आणण्याची कसरत जोरात सुरू झाली आहे. मात्र, ते परतणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, दोन्ही देशांनी एप्रिल 2021 मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

2009-2018 या कालावधीत केला प्रचंड भ्रष्टाचार
गुप्ता बंधू अजय, अतुल आणि राजेश गुप्ता यांची माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक असल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या स्थानिक चलनाचा मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचा आरोप आहे. हा भ्रष्टाचार 2009 ते 2018 दरम्यान झाला होता. मात्र, घोटाळे उघड झाल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेतून पळून गेले. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी प्रथमच कबूल केले की आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमधील मतभेदांमुळे, देशातील घोटाळ्यात कथितरित्या गुंतलेल्या गुप्ता कुटुंबाविरुद्ध योग्य कारवाई करता आली नाही.

1994 मध्ये कुटुंबासह दक्षिण आफ्रिकेत झाले स्थलांतरित
अजय, अतुल आणि राजेश गुप्ता 1994 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत दक्षिण आफ्रिकेत आले होते. ते माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या खूप जवळचे होते. लवकरच गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या पाच श्रीमंत लोकांमध्ये सामील झाले. उद्योगपती गुप्ता बंधू मूळचे सहारनपूरचे आहेत. त्यांचे वडील शिवकुमार यांचे सहारनपूरमध्ये रेशनचे दुकान होते. दिल्लीत उघडलेल्या त्यांच्या कंपनीतून ते मसाले निर्यात करायचे. त्यांची दुसरी कंपनी टॅल्कम पावडरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोपस्टोअर पावडरचे वितरण करत होती. सहारनपूरच्या राणीबाजारमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.