कुपवाडा आणि सोपोरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, आतापर्यंत तीन दहशतवादी ठार


जम्मू – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर सोपोरमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, त्यांना कुपवाडा येथील चक्र कांडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर देत आहेत. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत लष्कराच्या एकासह दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तुफैल असे ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी होता. ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे, सोमवारी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षा दलांनी मारला. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक घटनास्थळावरून पसार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, पाच मॅगझिन आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, त्याची ओळख हंजला, पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे.