या देशात पंतप्रधान सुद्धा करतात सायकलचा वापर

प्रदूषण, वाढती वाहन संख्या, रस्ते अपघातात वाढलेले मृत्यूचे प्रमाण, पर्यावरण धोका अशा अनेक विषयांवर सतत चर्चा होते मात्र त्यासाठी काही ठोस पावले उचलली जात नाहीत. प्रदूषण आणि रस्ते अपघात मृत्यू, पेट्रोल किमती यावर एक चांगला उपाय सायकलचा वापर हा आहे. जगात हे जाणून घेणारा एक देश आहे जेथे सायकलस्वारांचे जणू राज्य आहे. या देशात ९० टक्के ये जा सायकलवरून होतेच पण देशाचे पंतप्रधान सुद्धा संसदेत,कार्यालयात सायकल वरून जातात. सायकल संदर्भातले नवे नवे शोध सुद्धा याच देशात अधिक प्रमाणात लागतात. हा देश आहे नेदरलंड.

भारतात ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा होतो मात्र देशात रस्त्यावरून सायकल चालविणे फार धोकादायक आहे कारण वाढती वाहतूक. यामुळे सायकलींचा वापर मर्यादित आहे. सायकल चालविणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच पण त्यामुळे प्रदूषणही होत नाही. नेदरलंडची राजधानी अॅमस्टरडॅम ही मात्र सायकलची जागतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथे सायकल इतकी लोकप्रिय आहे की १९५० -६० च्या दशकात जेव्हा कार्सची संख्या वाढू लागली तेव्हा पासून येथील नागरिकांनी सायकल कायम राहिलीच पाहिजे यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. परिणामी सरकारला नवीन रस्ते विकसित करताना कार्स बरोबर सायकल साठी वेगळे मार्ग ठेवावे लागले.

या शहरात सायकलस्वारांसाठी अतिशय उत्तम, आरामदायी आणि सुरक्षित रस्ते नेटवर्क आहे . यामुळे येथे लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. सर्व डच शहरातून ही सायकल संस्कृती रुजली असून येथील नागरिक सायकल चालविणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार मानतात. आज या देशात २२ हजार मैलांचा सायकल साठी रिंग रोड असून आता लोक पारंपारिक सायकल प्रमाणे इलेक्ट्रिक सायकलला सुद्धा पसंती देताना दिसतात.\