पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘ जन समर्थ पोर्टल’ लाँच

क्रेडीट लिंक्ड सरकारी योजनांसाठी बनविल्या गेलेल्या ‘जन समर्थ पोर्टल’ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. या नव्या पोर्टल मुळे सर्व भारतीय नागरिकांना सरकारी योजनेतून सहज कर्ज घेणे सुलभ होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय व कार्पोरेट कार्य मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक वीक’ उद्घाटनाची सुरवात मोदी यांच्या हस्ते झाली. यावेळी एक नवीन नाणे मालिका जारी केली गेली.

जन समर्थ पोर्टलचा उद्देश नागरिकांना सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर डिजिटल माध्यमातून सहज, सोप्या रीतीने जाणून घेता याव्यात असा आहे आणि त्या साठी हे पोर्टल लिंक्ड योजनेचे कव्हरेज सुनिश्चित केले गेले आहे. विविध मंत्रालयांच्या वेबसाईट पाहण्याऐवजी नागरिक भारत सरकारच्या एक एकाच पोर्टलवर या मंत्रालयांच्या योजना जाणून घेऊ शकणार आहेत. अश्या १२ सरकारी योजना येथे प्रदर्शित केल्या गेल्या आहेत.

कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने २०१८ मध्ये विभिन्न कर्ज योजनांचे पोर्टल ‘psbloansin59minutes.com’ सुरु केले आहेच. त्यात एमएसएमआय, गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सरकारी बँकांकडून १ तासात मंजूर होण्याची सुविधा दिली गेली आहेच. या नव्या पोर्टल मुळे हे काम अधिक सुलभ होणार आहे. पहिले पोर्टल कर्ज घेऊ इच्छिणाऱ्याना ऋणदात्यांशी जोडणार आहे. यात चार कर्ज श्रेणी मध्ये १३ योजना आहेत आणि १२५ कर्जदात्या संस्था आहेत. त्यामुळे युवा, मुद्रा कर्ज घ्यायचे कि स्टार्टअप इंडिया लोन घ्यायचे हा निर्णय घेऊ शकतील.

या नव्या पोर्टल मुळे स्वरोजगार वाढीला मदत होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या योजनेतून शैक्षणिक, कृषी पायाभूत सुविधा, यासाठी सुद्धा कर्ज घेता येणार आहे. त्यासाठी संबंधिताना आधार, मतदार कार्ड, पॅन नंबर, बँक स्टेटमेंट अशी काही कागदपत्रे सादर करावी लागतील असे समजते.