सुईच्या नेढ्यात बसेल इतका सूक्ष्म राणी एलिझाबेथचा पुतळा
ब्रिटीश राजघराण्यातील सत्तेची ७० वर्षे पूर्ण करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ चा एक अति सूक्ष्म पुतळा मायक्रो आर्टिस्ट डीव्हीड लिंडन यांनी तयार केला आहे. राणीच्या सत्तेला ७० वर्षे पूर्ण झाल्याने अनेकांनी विविध पद्धतीने राणीचा सन्मान केला आहे त्याचाच हा पुतळा एक भाग आहे. अवघ्या १ मिलीमीटरचा हा पुतळा सुईच्या नेढ्यात सहज मावू शकतो आणि मायक्रोस्कोप खाली पाहिल्याशिवाय दिसत नाही.
हा पुतळा ०.६ मिमी रुंद आणि १ मिमी उंच आहे. त्यात राणीच्या मस्तकावर राजमुकुट आहे. हा पुतळा बनविण्यासाठी डेव्हिड यांना ३ महिने लागले. ते म्हणतात, अतिशय काळजी घेऊन तो बनवावा लागला. साधी शिंक किंवा खोकला आला तरी तो फुटण्याची शक्यता होती. वाहनांच्यामुळे येणारी कंपने किंवा मोठे आवाज यामुळे इजा होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यांनी पुतळ्याचे सर्व काम रात्री शांतवेळी केले.
डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार डेव्हिड लिंडन हे इंजिनिअर असून त्यांनी ब्रिटीश संरक्षण विभागासाठी विमान सिस्टीम आणि युरोफायटर बनविण्याचे काम केले आहे. निवृत्ती घेतल्यावर गेली पाच वर्षे त्यांनी मायक्रो आर्ट साठी जीवन समर्पित केले आहे. आता तेच त्यांचे आयुष्य आहे. त्यांनी सुईच्या नेढ्यातून सहज आरपार होतील अशा अनेक प्रतिमा बनविल्या आहेत. त्यातील त्यांची सर्वात चांगली कलाकृती राणीची प्रतिमा आहे.
लिंडन सांगतात, हे काम फार काळजीपूर्वक करावे लागते आणि थकवा आणणारे आहे. प्रतिमेला नुकसान होऊ नये म्हणून श्वास सुद्धा अगदी कमी गतीने घ्यावा लागतो. ही प्रतिमा पाहण्यासाठी मायक्रोस्कोप वापरावा लागतो. पण काम पूर्णत्वास गेले कि मिळणारे समाधान फार मोठे आहे.