या बॉलीवूड कलाकारांना सुद्धा मिळाल्या होत्या धमक्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम यांना धमकीचे पत्र मिळाल्यावर त्यांची सुरक्षा वाढविली गेल्याचे सांगितले गेले होते आणि सलमान खान पोलीस गराड्यात हैद्राबादला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचल्याचे फोटो पेपर मध्ये झळकले आहेत. मात्र अशी धमकी मिळालेला सलमान हा एकमेव अभिनेता नाही. यापूर्वी सुद्धा अनेक कलाकारांना अश्या धमक्या मिळाल्या आहेत.

या यादीत शाहरुख खान यांचाही नंबर असून २०१४ मध्ये छोटा राजनचा हस्तक रवी पुजारी याने एका पत्रातून शाहरुखला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शाहरुख त्यावेळी ‘हॅपी न्यू इअर’ चित्रपटाचे शुटींग करत होता तेथेच त्याला ‘आता पुढचा नंबर तुझा’ असे धमकीचे पत्र मिळाले होते. आमीर खान ‘सत्यमेव जयते’ सिरीज करत होता तेव्हा त्यालाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तेव्हा आमीरने सुरक्षेसाठी बुलेट प्रुफ कार खरेदी केली होती असे समजते.

गायक उदित नारायण यांना २२ वर्षापूर्वी फोन कॉल करून ‘ गाणे सोड अन्यथा गेम करू ‘ अशी धमकी दिली गेली होती. त्यानंतर अनेक महिने उदित नारायण यांनी गाणे सोडले होते. अरिजित सिंग या गायकाला सुद्धा अंडरवर्ड कडून धमकी आली होती. रवी पुजारीने त्याच्याकडे ५ लाखाची खंडणी आणि दोन स्टेज शो मोफत करण्याची मागणी केली होती. अरिजित ने या बाबतीत पोलीस तक्रार केली होती.

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार यालाही रवी पुजारी यानेच फोन वरून धमकी दिली होती. अक्षयच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कामावरून कमी केले म्हणून सतत दोन वर्षे अक्षय कुमारला धमक्या दिल्या जात होत्या. अखेर त्याने पोलिसात तक्रार केली तेव्हा त्याला सुरक्षा दिली गेली होती असे समजते.