सल्लूभाईला धमकीचे पत्र

बॉलीवूड दबंग खान सलमान आणि त्याचे वडील सलीम यांना रविवारी धमकीचे पत्र मिळाले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. बांद्रा पोलिसांनी या बाबत अज्ञात व्यक्तीविरुद्द एफआयआर दाखल केला असून तपास सुरु केला आहे असे समजते.

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवला यांना पंजाबच्या मानसा येथे गाडीवर गोळीबार करून ठार केले गेले होते. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सलमान खान यालाही धमकीचे पत्र मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मिडिया रिपोर्ट नुसार २०१८ मध्ये सलमान खान लॉरेन्स बिष्णोई यांच्या निशाण्यावर होता. सिद्धू मुसेवाला यांची हत्या याच विश्नोईने केल्याचा संशय आहे.

२०१८ मध्ये बिष्णोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्यामागे सलमानचे काळवीट शिकार प्रकरण कारणीभूत होते. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र प्राणी मानला जातो. तेव्हाही धमकी मिळाल्यावर सलमान खानची सुरक्षा वाढविली गेली होती. मुंबई पोलिसांनी धमकीच्या पत्राच्या आधारावर एफआयआर दाखल करून घेतला असल्याचे सांगितले जात आहे. पत्रात काय मजकूर होता याचा खुलासा मात्र झालेला नाही.