यंदाचा ‘योग दिवस’ मैसूर मध्ये साजरा करणार पंतप्रधान मोदी
यंदाच्या वर्षी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असून देशात तसेच जगभरातील अनेक देशात त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे. देशात या वर्षीचा प्रमुख सोहळा कर्नाटकातील प्रसिद्ध मैसूर येथे होणार असून त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. आयुष मंत्रालयाकडून या कार्यक्रमासाठी अनुमोदन मिळल्याचे मैसूरचे खासदार प्रताप सिंग यांनी सांगितले. सिंघ यांनी पंतप्रधान मोदी यांना यंदाचा योग दिवस मैसूर मध्ये साजरा करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते आणि पंतप्रधानांनी ते स्वीकारले आहे असे सिंघ यांनी सांगितले.
खासदार प्रताप सिंघ म्हणाले, मैसूर आणि योग यांचे अनोखे नाते आहे. मैसूरचे राजे वाडियार यांनी योग प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी योग करणे अत्यंत उपयुक्त असल्याचे आता जगाने मान्य केले आहे असे सांगून सिंघ म्हणाले, टी कृष्णम्माचारी, बीकेएस अय्यंगार या योग गुरूंचे प्राथमिक योग शिक्षण मैसूर येथेच झाले होते. त्यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जीवन वेचले आहे.
आजघडीला मैसूर शहरात शेकडो नोंदणीकृत योग प्रशिक्षण संस्था आहेत तसेच नोंदणी न झालेल्या संस्थांची संख्या सुद्धा मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा हा कार्यक्रम रेस कोर्स किंवा ऐतिहासिक मैसूर पॅलेसचा पटांगणात होणार आहे. रेस कोर्स वर कार्यक्रम झाल्यास लोक उपस्थितीचे नवे रेकॉर्ड नोंदविले जाईल असा विश्वास सिंघ यांनी व्यक्त केला. मात्र राजवाडा परिसरात कार्यक्रम झाल्यास मर्यादित प्रवेश दिला जाईल आणि शहरात जागोजागी योग शिबीर होईल असे त्यांनी सांगितले.