चीनी मिडीयाला ‘लॉकडाऊन’ शब्द वापरण्यास सरकारची बंदी

चीन मध्ये गेले काही दिवस वाढत्या करोना केसेस आणि त्यामुळे महत्वाच्या शहरात लावला गेलेला लॉकडाऊन हा चर्चेचा विषय होऊ लागला असतानाचा चीन सरकारने चीनी प्रसार माध्यमात लॉकडाऊन या शब्दाचा वापर न करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त चीनी डिजिटल टाईम्स बेबसाईटवर दिले गेले आहे. कोणत्याही प्रकारच्या बातमीत या शब्दाचा वापर करण्यास चीन सरकारने प्रसार माध्यमांना बंदी केली आहे.

चीनची उद्योगनगरी आणि देशाची आर्थिक राजधानी शांघाई मध्ये गेले दोन महिने करोना मुळे लॉकडाऊन लावला गेला असून अतिशय कडक नियमावली लागू केली आहे. १ जून पासून नियम थोडे शिथिल झाले असले आणि काही प्रमाणात कार्यालये सुरु झाली असली तरी करोना टेस्टिंगची व्यापक मोहीम राबविली जात आहे. आठवड्यातून दोन वेळा नागरिकांना करोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

लॉकडाऊन मध्ये सवलती दिल्याच्या बातम्यांमुळे चुकीचा संदेश दिला जातो असे चीन सरकारचे म्हणणे आहे. पत्रकार, संपादक यांना अश्या सूचना तोंडी दिल्या जातात आणि त्या अनेकदा चुकीच्या असतात. काही वेळा स्थानिक अधिकारी या संदर्भात घोषणा करतात आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते यामुळे लॉकडाऊन हा शब्द येईल अशी कोणतीही बातमी न देण्याच्या सूचना प्रसार माध्यमांना दिल्या गेल्याचे समजते.