अयोध्या राममंदिर- गर्भगृहाचे हे असते महत्व
अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम सुरु झाले असून १० जून रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आधारशीला बसविली गेली. अनेकांना गर्भगृह म्हणजे नक्की काय याची माहिती नसते. हिंदू मंदिराचे जे अनेक भाग असतात त्यात गर्भगृह हा अतिशय महत्वाचा भाग मानला जातो. मंडप, सभागृह, गर्भगृह असे मंदिराचे सर्वसाधारण भाग असतात. त्यातील गर्भगृह हा असा भाग आहे जेथे देवाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
या गर्भगृहाचा आकार, प्रकार आणि मूर्ती स्थापन करण्याची जागा या संदर्भात काही शास्त्रसंमत नियम आहेत. गर्भगृह ही खिडकी नसलेली, कमी प्रकाश असलेली आणि एक छोटा दरवाजा असलेली खास जागा असते. जाणीवपूर्वक ती तशी बांधली जाते यामागे भक्ताचे चित्त आणि दृष्टी देवाच्या मूर्तीवर केंद्रीत व्हावी हा मुख्य उद्देश असतो. सामान्यपणे ही खोली वर्गाकार असते आणि मूर्ती साठी चबुतरा असतो. विष्णू अथवा अन्य देवांच्या मूर्ती मागच्या भिंतीलगत असतात मात्र शिवलिंग गर्भगृहाच्या मधोमध स्थापन केले जाते.
पूर्वी गर्भगृहाचे दार उंचीला अगदी कमी असे मात्र आता त्याचा आकार वाढला आहे. जेथे आयताकार गर्भगृह असते तेथे एकापेक्षा अधिक मूर्ती असतात. काही मंदिरात गर्भगृहात जाण्यासाठी तळघरात जावे लागते. हे मंदिराचे ब्रह्मस्थान मानले जाते त्यामुळे तेथे शुचिर्भूत होऊन प्रवेश करणे बंधनकारक असते.
अयोध्या राममंदिरचे गर्भगृह नागर शैली मध्ये बांधले जाणार आहे. उत्तर भारतातील बहुतेक मंदिरे नागर शैली मध्ये बांधली गेली असून द्रविड आणि बेसर असे अन्य दोन बांधकाम शैलीचे प्रकार आहेत. नागर शैलीचे आठव्या ते १३ व्या शताब्दीतील शासकांनी विशेष संरक्षण केले असे सांगितले जाते.