अमरनाथ यात्रा- स्टिकी बॉम्ब मुळे सुरक्षा यंत्रणा चिंतेत
पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३० जून पासून सुरु होऊन ११ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी या यात्रेवर ‘स्टिकी बॉम्ब’ चे संकट घोंगावत असल्याने यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. जम्मू काश्मीर भागातून ताब्यात घेण्यात आलेले काही दहशतवादी आणि त्यांचे हिंतचिंतक यांच्या चौकशीत दहशतवादी समूहाकडे स्टिकी बॉम्ब असू शकतात याची कबुली मिळाली असून त्या संदर्भात काही पुरावे हाती आले आहेत.
‘स्टिकी बॉम्ब’ म्हणजे कोणत्याही पृष्ठभागावर सहजरीत्या चिकटू शकणारे बॉम्ब. या बॉम्बचा स्फोट दुरून रिमोट कंट्रोलने करता येतो. नुकतेच पाकिस्तान मधून आलेले आणि बिघाड झाल्याने कटूआ भागात कोसळलेल्या ड्रोन मधून असे बॉम्ब, शस्त्रे आणि दारुगोळा मिळाला होता. परिणामी अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेची नवी रणनीती ठरविले गेली आहे. यंदा या यात्रेला तीन लाख भाविक येतील असा अंदाज आहे.
या यात्रेत वाहने ठराविक ठरलेल्या ठिकाणीच पार्क करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असून सुरक्षा वाहनांसाठी सुद्धा असेच नियम केले गेले आहेत. चोहीकडे सुरक्षा सैनिक सतर्क राहणार आहेत. गेल्या फेब्रुवारी मध्ये काश्मीर मध्ये असे बॉम्ब प्रथम सापडले होते. यापूर्वी इराक आणि अफगाणिस्थान मध्ये अश्या बॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतात प्रथम इराणी दहशतवाद्यांनी याचा उपयोग इस्त्रायलचा दूतावासाजवळ एका वाहनात केला होता. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सेनेने अश्या बॉम्बचा वापर केला होता. रिमोट अथवा इन बिल्ट टायमरच्या सहाय्याने या बॉम्बचा स्फोट दुरून सुद्धा करता येतो.