आपण भाजी खरेदी करायला जातो तेव्हा आले अवश्य खरेदी केले पाहिजे आणि ते जमेल त्या पद्धतीने वापरले पाहिजे. कारण ते अनेक प्रकारे वापरले जात असते आणि आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम करीत असते. अ, क, इ, बी कॉम्प्लेक्स या जीवनसत्त्वांनी युक्त असतेच पण त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, कॅल्शीयम, सोडियम, सिलीकॉन हे घटक असतात. आले आहे तसे कच्चेही खाल्ले जाते, त्याचा रस काढून तो घेतला जातोच पण आले अनेक पदार्थांत चवीसाठीही घातले जाते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी आपण चहा करतोच पण त्यातल्या त्यात चहात आले घातल्यास पाहुण्यांना जास्त आनंद होतो. आल्याने चहाची चव तर वाढतेच पण त्याचा औषधी परिणामही होतो.
बहुगुणी आले
आले बहुगुणी असते आणि ते घेण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. ते उपिटासारख्या उपाहाराच्या पदार्थांत आपोआपच घातले जाते. आल्याने सर्दी कमी होते. त्याच्यामुळे अनेक आजार तर बरे होतातच पण त्याचा एक फायदा म्हणजे त्याच्यामुळे एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. संधीवातामुळे गुडघ्यात वेदना होतात तेव्हा वेदना होत असलेल्या किंवा सुजलेल्या भागावर आले कुटून त्याचा लेप द्यावा. त्यामुळे वेदना आणि सूज असे दोन्ही कमी होतात. आले कच्चे खाल्ल्याने ते जठरात जाते आणि तिथे अन्नाचे पचन करण्यात अडथळा ठरणार्या सगळ्या घातक द्रव्यांना पचनसंस्थेच्या बाहेर काढून पचन वाढवण्याचे काम करते.
महिलांच्या मासिक पाळीतले त्रास आणि अर्धशिशी याही विकारांवर आले गुणकारी आहे. त्याशिवाय ते मधुमेहाला नियत्रित करते. मधुमेहावर घेतल्या जाणार्या इन्शुलीनची परिणामकारकता वाढवण्यासही ते उपयुक्त आहे. त्यासाठी सकाळी आल्याचा तुकडा कोमट पाण्यासोबत खाल्ला जातो. त्यामुळे ब्लड शुगर मर्यादेत राहते. मधुमेहामुळे आपल्या आरोग्याच्या काही कटकटी निर्माण होत असतात. त्याही आल्यामुळे कमी होतात. आले इतके गुणकारी असते की ते आपल्या रक्तदाबही नियंत्रणात ठेवते आणि हृदयाची ताकद वाढवते. त्यासाठी आल्यातले पोटॅशियम आणि मँगनीज यांचा उपयोगी होत असतो. आपल्याला अनेकदा झोप अपुरी झाली सकाळी झोेपेतून उठल्यावर अस्वस्थता जाणवते. तो काही आजार नसतो पण त्याला मॉर्निंग सिकनेस म्हटले जाते. हा सिकनेस आल्याने कमी होतो. आले आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे उपयुक्त असते.