जादुई वृक्ष : शेवगा


मोरिंगा किंवा शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीशा करण्यास समर्थ असल्याने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने शेवग्याला “जादुई वृक्ष” असे म्हटलेले आहे. साधारण १०० ग्राम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटाशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण जरूर करायला हवा.

शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे ( जीवनसत्व ब, ब१, ब२, ब३, ब५, ब६, ब१२, सी, डी, के, फॉलिक acid इ. ) आहेत. त्याचबरोबर ८ प्रकारची अमिनो असिडस्, तसेच अनेक प्रकारचे antioxidants, anti inflammatory तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत. शेवग्याचे झाड लावणे आणि त्याची मशागत करणे तितकेसे अवघडही नाही. शेवग्याचे झाड अतिशय झपाट्याने वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवगा होतो. शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्याच्या आरोग्यवर्धक गुणांविषयी थोडेसे..

शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी antiseptic म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे पोटीस करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास गुण येतो.

शेवग्याच्या पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगांमध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यास किंवा bronchitis चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शाहिराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली b कॉम्प्लेक्स जीवनसत्वे ( नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड ) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

असा हा बहुपयोगी, बहुगुणी शेवगा.. याचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करावा आणि शरीरस्वास्थ्य उत्तम ठेवावे.

Leave a Comment