रक्तदाब नियंत्रणासाठी आहार


सध्या आपल्या आयुष्यामध्ये बैठ्या कामामुळे काही आजार बळावत चालले आहेत. त्यांना लाईफ स्टाईल डिसिजेस् असे म्हटले जाते. मधूमेह, डिप्रेशन, रक्तदाब आणि हृदयविकार असे हे आजार औषधाने कायमचे बरे होत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची चिंता लागून राहते. मात्र हे सारे आजार लाईफ स्टाईल म्हणजे जीवन पध्दतीशी निगडित असल्यामुळे त्यांच्यातून सुटका करून घेण्याकरिता औषधे न वापरता जीवनपध्दतीत बदल केला की गुण येतो. एका अर्थाने ही गोष्ट सोपी आहे. जीवनपध्दतीत करावयाच्या बदलामध्ये पहिला बदल असेल तो आहारातला तेव्हा रक्तदाब नियंंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहार करावा हे एकदा माहीत करून घेतले आणि प्रत्यक्षात तसा आहार घेतला तर रक्तदाबावर बरेचसे नियंत्रण येते.

आहारातला पहिला बदल म्हणजे फळे भरपूर खाणे. पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादींचा भरपूर पुरवठा करणारी द्राक्षे रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकतात. द्राक्षांमुळे रक्तवाहिन्यांवरचा दबाव कमी होतो. पोटॅशियमचा भरपूर पुरवठा करणारे दुसरे फळ म्हणजे केळी. केळी पॉटॅशियमशिवाय बी-६ आणि जीवनसत्त्व क यांचाही भरपूर पुरवठा करत असतात. त्यामुळे केळी खाण्यानेसुध्दा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डियॉलॉजी या संस्थेच्या मासिकात म्हटले आहे. दररोज १६०० मिली ग्रॅम पोटॅशियम ग्रहण करणारे लोक रक्तदाबापासून आणि हृदयविकारापासून दूर राहण्याची २१ टक्के शक्यता असते.

कांदा हे आपले नेहमीचे खाद्य. पण ते नित्य नियमाने न चुकता खाल्ले तर त्यातील ऍडनोसाईन हे द्रव्य स्नायूला आराम देते. दररोजच्या दोन्हीही जेवणात सलग १५ दिवस कांदा खाल्ला तर त्याचा रक्तदाबावर झालेला परिणाम जाणवतो. कांद्याबरोबर लसूणसुध्दा रक्तवाहिन्यात साठलेले आणि रक्तवाहिन्याच्या आतल्या भिंतींवर चिकटून बसलेले कोलेस्टेरॉल मोकळे होते. तेव्हा लसणाच्या दोन पाकळ्या रोज नियमाने खाव्यात. रक्तप्रवाह वाहता राहतो. त्यातले अडथळे दूर होतात. शहाळे हे अनेक पोषणद्रव्यांचे आगार असते. त्यात सोडीयम, पोटॅशियम, कॅल्शियम, क जीवनसत्त्व आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व द्रव्ये असतात. असेच एक दुसरे फळ म्हणजे टरबूज. टरबूज रक्तातल्या गुठळ्या कमी करते. कोथिंबीर रक्तातील साखर कमी करते तर पुदीना हायपरटेंशन कमी करते. लिंबू तर सर्व दृष्टीने उपयुक्त असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment