मनोविकारांचे वाढते प्रमाण


जगात सध्या औद्योगीकरणाने गती घेतलेली आहे. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात बदल झाला आहे आणि जीवनविषयक कल्पनासुध्दा बदलल्या आहेत. जीवनातले यश नेमके कशात सामावलेले आहे या संबंधीचा संभ्रम हे आजच्या जीवनाचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. भरपूर पैसा मिळवला म्हणजे माणसाला यशस्वी समजावे अशी आजची यशाची व्याख्या झाली आहे. त्यामुळे लोक पैशाच्या मागे पळायला लागले आहेत. ही पळापळ अशीच चालू राहिली असती तर काही हरकत नव्हती. परंतु आपल्याला मिळणारा पैसा सतत असा मिळत राहील की नाही याची चिंता लोकांच्या मनाला लागून राहते आणि या अनिश्‍चिततेपोटी ते अनेक मनोविकारांना निमंत्रण देतात.

इंग्रजीमध्ये ज्याला डिप्रेशन म्हटले जाते तो विकार अशा अनिश्‍चिततेच्या भावनेतूनच पैदा झालेला असतो. आपले आजचे जीवनमान असेच टिकले नाही तर लोक आपल्याला हसतील आणि अप्रतिष्ठा होईल ही भीती लोकांच्या मनात सतत वसत राहते त्यातून डिप्रेशन येते. अशा डिप्रेशन झालेल्या लोकांची संख्या सार्‍या जगातच वाढत आहे. पण त्यातल्या त्यात भारतामध्ये ही वाढ मोठ्या वेगाने होत आहे. जगात दरवर्षी ३ कोटी २२ लाख लोक या विकाराला नव्याने बळी पडतात. त्यातील ५० टक्के मनोरुग्ण एकट्या भारत आणि चीन या दोन देशातले असतात.

२००५ ते २०१५ या दशकामध्ये डिप्रेशनचे बळी ठरलेल्या लोकांची संख्या १८.४ टक्क्यांनी वाढली आहे. २०१५ साली भारतातल्या डिप्रेशनने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या ३ कोटी ८० लाख एवढी होती. म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या ३ टक्के एवढे लोक या विकाराचे बळी आहेत. लोक आत्महत्या करतात त्यामागे अनेक प्रकारची कारणे असतात. मनोवैज्ञानिकांनी अशी २० कारणे शोधून काढली आहेत. त्यामध्ये डिप्रेशनचा विकार जडणे हे एक मुख्य कारण आहे. २०१२ साली अशा आत्महत्यांच्या प्रकरणांचा अभ्यास केला असता असे आढळून आले की भारतात त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. जगात तर ती वाढत चालली आहेच पण भारतात तिचा वेग जास्त आहे. डिप्रेशनचा विकार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. त्यातून आत्महत्या होतात. अशा प्रकारे २०१४ साली विविध कारणांमुळे झालेल्या आत्महत्यांचा जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले की जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती कसल्या ना कसल्या कारणाने आत्महत्या करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment