छातीत दुखणे


एखाद्या माणसाला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्याच्या छातीमध्ये असह्य वेदना होतात. काही चित्रपटांमध्ये हे दृश्य वारंवार दाखवले जाते. चित्रपटाच्या त्या कथेमध्ये एखाद्या पात्राच्या आयुष्यात धक्कादायक प्रसंग गुदरलेला दाखवला जातो. तेव्हा त्या पात्राला तो धक्का सहन होत नाही आणि ते पात्र छातीत वेदना होऊन हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडते. अशी दृश्ये वारंवार पाहिल्याने सर्वांच्याच मनामध्ये छातीत दुखणे आणि हृदयविकार यांचा काही दाट संबंध आहे अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यामुळे काहीही कारणामुळे छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते. पण डॉक्टरांचे वारंवार असे सांगणे आहे की छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही.

इतरही कारणाने छाती दुखू शकते. पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते. ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात. तर छातीत जळजळ करायला लागते. पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते. अशा वेळी छातीत होणार्‍या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणणे आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात. या वेदना स्नायूला होत असतात. कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो. हृदयाचेही दुसरे काही विकार असतात. हृदयाचा प्रत्येक विकार म्हणजे हृदयविकार नव्हे. तेव्हा हृदयविकाराला सोडून हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते.

न्युमोनिया हा सर्दीमुळे वाढणारा विकार आहे. न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात. हा विकार सर्दीबरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. न्युमोनियामध्ये कफ, ताप आणि खोकला एकदम होतो आणि छाती दुखते. जास्त दगदग झाल्यानेसुध्दा छातीत दुखू शकते. त्यामुळे वरील कारणाने होणार्‍या छातीतल्या वेदना आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी होणार्‍या वेदना यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा होणार्‍या छातीतल्या वेदना वेगळ्या असतात. अशावेळी छाती वरवर दुखत नाही. तर आतून प्रचंड वेदना होतात. त्या वेदनांचा त्रास घसा, हाताचे दंड आणि एवढेचे नव्हे तर जबड्यांनाही होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment