लाइफस्टाइल डीसीजेस टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदला..


मानसिक ताण-तणाव, शारीरिक थकवा हे आपल्या सततच्या धावत्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये बनली आहेत. दहा पैकी सहा लोकांच्या बाबतीत ब्लड प्रेशर, डायबिटीस, किंवा कोलेस्टेरोल वाढल्याचे नजरेस पडत आहे. वाढलेले कोलेस्टेरोल हृदयविकारास आमंत्रण ठरू शकते. औषधांचा वापर करून व्याधींचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणता येते, पण त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये थोडेफार परिवर्तन आणल्यास आरोग्यासंबंधीच्या लहान मोठ्या तक्रारी नियंत्रणात ठेऊन पुढे उद्भवणाऱ्या व्याधींपासून आपला बचाव होऊ शकतो.

आपली जीवनशैली बदलायची म्हणजे नेमके काय करायचे? जे आपण रोज खातो, पितो, किंवा आपल्या रोजच्या ज्या काही activities असतील, हे सर्व सोडून देऊन नवीन सवयी आत्मसात करायच्या का? याचे उत्तर नाही असेच असणार आहे, कारण आपल्या रोजच्या सवयी आपल्याला पटकन बदलता येणे सोपे नाही आणि काही बाबतीत तसे शक्य ही होत नाही. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत परिवर्तन करताना आपल्या रोजच्या सवयींमध्ये किंवा आहारामध्ये आपण थोडेसे बदल केल्यास, पुढे उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारी वेळीच रोखण्यास मदत होऊ शकेल. या मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण घेत असलेला आहार. आपल्या आहारामध्ये ऑलिव ऑईल किंवा कनोला ऑईल सारख्या खाद्यातेलांचा उपयोग करावा.

या तेलामध्ये असणारे mono -unsaturated fats कोलेस्टेरोल नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी आहेत. ओमेगा ३ fatty acids मुबलक प्रमाणात असणाऱ्या खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. मांसाहारी लोकांसाठी रोहू, रावस, बांगडा इत्यादी प्रकारचे मासे, तसेच शाकाहारी लोकांसाठी अक्रोड, बदाम हा सुका मेवा, हे ओमेगा ३ fatty acids चे उत्तम स्रोत आहेत.त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये ताजी फळे, पालेभाज्या, oats, कडधान्ये यांचा वापर अवश्य करावा. आहाराबरोबरच अजून एक महत्वाचा भाग म्हणजे व्यायाम. आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये दररोज किमान अर्धा तास व्यायामासाठी देणे हितवाह आहे. सलग अर्धा तास व्यायामासाठी देणे कधी कधी आपल्याला कामाच्या व्यापात शक्य होत नाही. अश्या वेळी दिवसातून दोन किंवा तीन वेळेला दहा – दहा मिनिटांचा अवधी देता येईल असे पाहावे. शक्यतो लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा, किंवा ऑफिस पासून आपली गाडी थोड्या अंतरावर पार्क करून उरलेले अंतर चालत जावे, अश्या अनेक activities मधून व्यायाम मिळवता येईल. एखादा exercise group जॉईन करणे ही सुद्धा चांगली कल्पना आहे.

धुम्रापानाची सवय असल्यास ती आटोक्यात आणायचा प्रयत्न करावा. धुम्रपान करणे सोडणाऱ्या व्यक्तींना काही दिवसांमध्येच आपल्या शरीरामध्ये फरक जाणवू लागतो – श्वसनक्रिया सुधारते, रक्तामधील ऑक्सिजन लेवल्स मध्ये वाढ होऊन रक्ताभिसरण सुधारते, तसेच फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. धुम्रापानाप्रमाणेच अल्कोहोलचेही प्रमाण नियंत्रणात ठेवावे.

शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी आपल्या कामाचे आणि वेळेचे विचारपूर्वक नियोजन करावे. आपल्याला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो अश्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढावा. आपल्याला जाणवत असलेल्या तब्येतीच्या तक्रारी दूर करण्याकरिता जीवनशैलीतील बदलाबरोबरच क्वचित औषधांची जोड ही द्यावी लागते. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधांचा उपयोग करावा.

Leave a Comment