“ असावा सुंदर टुमदार बंगला, सभोवार त्याच्या बगीचा चांगला “..असे असले तर ते कोणाला नकोसे असेल? शहरांमध्ये, अपार्टमेंटमध्ये किंवा मल्टीस्टोरी बिल्डिंग्स मध्ये वास्तव्य करीत असलेल्या लोकांनासुद्धा घरामध्ये बगीचा तयार करून हिरव्यागार निसर्गाचा आनंद मनमुराद लुटता येऊ शकतो. पण कित्येकदा, जागेचा अभाव, फुलझाडांविषयी आणि त्यांची निगा कशी राखावी याबद्दल अपुरी माहिती असणे, अश्या कारणांमुळे घरामध्ये बगीचा तयार करण्याचा विचार पुढे ढकलला जातो. पण आता काही लहान लहान गोष्टींचा अवलंब केल्यास घराच्या बाल्कनीमध्ये सुंदर बगीचा तयार करता येऊ शकतो.
निसर्गाची हिरवळ , आता आपल्या घरात..
बाल्कनीमध्ये बगीच्याचा layout निश्चित करत असताना सर्वप्रथम आपल्या बाल्कनी मध्ये सूर्यप्रकाश दिवसाच्या कुठल्या वेळी येतो आणि कितीवेळ राहतो हे बघून घ्यावे. त्याचबरोबर बाल्कनीच्या कुठल्या भागात सूर्यप्रकाश अधिक असतो आणि कुठल्या भागात कमी असतो हे ही पहावे, म्हणजे त्यानुसार अधिक किंवा कमी सूर्यप्रकाशाची गरज असणारी झाडे त्या-त्या भागांमध्ये ठेवता येतात.
ऑनलाईन उपलब्ध असलेली माहिती वाचून घेऊन, किंवा एखाद्या चांगल्या नर्सरीमध्ये जाऊन, आपल्या बाल्कनीमध्ये उपलब्ध असलेल्या जागेनुसार आणि आपण रहात असलेल्या ठिकाणच्या हवामानानुसार झाडांची किंवा रोपांची निवड करावी.
सूर्यप्रकाश आणि पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, झाडांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून, त्या-त्या गटातील झाडांची एकत्र मांडणी करावी. म्हणजे एका गटातील झाडांची, सूर्यप्रकाशाची आणि पाण्याची गरज एकसमान असायला हवी. त्याचप्रमाणे एकदम खूप सारी झाडे किंवा रोपांच्या कुंड्या एकाच ठिकाणी अडी-अडचणीने रचून ठेऊ नयेत. असे केल्याने झाडांची खुरपणी करण्यास, त्यांना पाणी देण्यास अडचण तर होतेच, पण त्याशिवाय त्यातल्या त्यात मोठी झाडे इतर लहान झाडांना सूर्यप्रकाश मिळण्यासाठी अडचणीची ठरू शकतात.
फुलझाडे किंवा शोभेची झाडे कुंड्यांमधून लावताना, ती झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर किती उंच किंवा रुंद होणार आहेत हे लक्षात घेऊन त्यानुसार कुंड्यांची किंवा planters ची निवड करावी. झाड वाढायला लागल्यानंतर कुंडी छोटी पडते आहे असे वाटल्यास ते झाड मोठ्या कुंडीमध्ये लावावे. झाडे किंवा रोपे लावण्यास टेराकोटाच्या कुंड्या सगळ्यात उत्तम. प्लास्टिकच्या कुंड्या वापरणार असल्यास त्या कुंड्यांमध्ये अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास छिद्र असावीत. रोपांना पाणी घालताना एकदम खूप सारे घालू नये. प्रत्येक रोपाची पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी घालावे.
बगीच्याची सुरुवात करताना एकदम खूप सारी रोपे किंवा फुलझाडे आणू नयेत. आधी थोडीच रोपे आणून, त्यातील काही फुलझाडे ‘ annuals ‘ आणि काही ‘ perennials ‘ असावीत. ‘annuals’ लवकर वाढून त्यांना फुले लवकर येतात आणि ती जास्त काळ टिकून राहतात, त्यामुळे ज्यांना रंगबिरंगी फुलझाडे पसंत असतील त्यांनी ‘ annuals जास्त लावावीत. मात्र ह्या प्रकारची फुलझाडे एकाच हंगामापुरती टिकत असल्यामुळे दरवर्षी नवीन हंगामामध्ये नवीन फुलझाडे लावावी लागतात. perennials मात्र सदा हिरवी राहतात. त्यांच्या फुलण्याच्या हंगामानुसार त्यांना फुले येऊन जातात, पण ह्या प्रकारची फुलझाडे पुन्हा पुन्हा लावावी लागत नाहीत.
झाडांवर पसरणारी कीड किंवा रोग वेळीच लक्ष देऊन, आवश्यक त्या कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रणात आणावेत. त्याचबरोबर, वाळलेली पाने, फांद्या इत्यादी वेळोवेळी काढत राहिल्याने झाडांची निगा चांगल्या प्रकारे होऊ शकते.
जर बाल्कनीत जागा कमी असेल तर बाल्कनीच्या भिंतींवर railings लाऊन किंवा stands ठेऊन त्यावर कुंड्यांची मांडणी करावी. घराच्या सजावटीप्रमाणेच बगीच्याच्या सजावटीकडेही लक्ष द्यावे. terracota चे सुंदर शोपीस, रंगबिरंगी “ pebbles “, एखादा लहानसा sitting कॉर्नर अशी सजावट केल्यास पाहता पाहता आपल्या मनासारखा बगीचा तयार होईल.