केसांची गळती रोखण्यासाठी..


प्रदूषण, अनुवांशिकता, शारीरिक थकवा, मानसिक तणाव, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी आणि त्यातील अनियमितता, आरोग्याची हेळसांड, या आणि अश्या अनेक कारणांमुळे अगदी लहान वयापासूनच केस गळतीची समस्या उद्भवत आहे. केसांवर करून घेण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, निरनिराळे हेअर स्प्रे, हेअर डाइज, केसवाढीकरिता अपुरे पोषण, ह्या सगळ्याच गोष्टींमुळे केस गळतीची समस्या बळावत चालली आहे. ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण घरच्याघरीच साध्या सोप्या उपायांचा अवलंब करून या समस्येपासून मुक्ति मिळवू शकतो.

नारळाचे दूध : नारळाचे दूध केसांना चोळून लावल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते. नारळाच्या दुधामध्ये विटामिन इ, fats, आणि पोटाशियम मुबलक प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या निरोगी वाढीकरिता अतिशय आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे केसांच्या चांगल्या वाढीकरिता आवश्यक प्रथिने, नारळाच्या दुधामध्ये असतात. नारळाच्या दुधाबरोबरच, नारळाच्या ( खोबरेल ) तेलाचा वापर नियमित केल्यास केस गळती आटोक्यात आणता येते.

कडूनिंब : कडूनिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन, त्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करावा. त्यामुळे केसांमध्ये कोंडा असल्यास कमी होउन केसाच्या मुळांना पोषण मिळते. कडूनिंबाच्या पानांमध्ये antibacterial properties असल्याने केस निरोगी राहण्यास मदत होते. मात्र कडूनिंबाच्या पाण्याने केस धुवत असताना ते पाणी डोळ्यात गेल्यास डोळ्यांची जळजळ होण्याचा संभव असतो. त्यामुळे त्याबाबतीत काळजी घ्यावी.

आवळा : आवळे वाळवून, खोबरेल तेलामध्ये, ते तेल काळसर होईपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर ह्या तेलाने केसांना मसाज करावा. साधारण वीस मिनिटे हे तेल केसांना राहू द्यावे. त्यानंतर नेहमी प्रमाणे शाम्पू ने केस धुवावे. आवळा विटामिन सी ने परिपूर्ण आहे. याच्या वापरामुळे केसांचे अकाली पिकणे कमी होऊन केस निरोगी राहतात. आपल्या आहारामधेही आवळ्याचा समावेश अवश्य करावा.

मेथी दाणे : मेथी दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाटून घेऊन, त्याची पेस्ट बनवून घेऊन, ती पेस्ट केसांना लावावी. साधारण ४० मिनिटे ही पेस्ट केसांना लावून ठेवल्यानंतर नेहमी प्रमाणे शाम्पूने केस धुवावेत. मेथी दाण्याच्या वापरामुळे केसांवर चकाकी तर येतेच, त्याचबरोबर hair follicles अधिक बळकट होण्यास मदत मिळते.

बीटची पाने : बीटच्या पानांमध्ये असलेली बी व सी ही प्रथिने, पोटाशीयम, हे घटक केसांच्या वाढी करता हितकारी आहेत. बीटाची पाने पाण्यामध्ये, पाण्याची मात्रा अर्धी होईपर्यंत उकळावी. ते पाणी थंड झाल्यावर पाने वाटून घेऊन, त्याची पेस्ट बनवून घ्यावी. त्या पेस्टमध्ये थोडी मेहेंदी घालून ती पेस्ट केसांना लावावी. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट केसांना लाऊन ठेवावी आणि त्यनंतर नेहमी प्रमाणे शाम्पूने केस धुवावेत.

कांद्याचा रस : कांदा किसून तो कीस पिळून घेऊन रस काढून घ्यावा. कापसाच्या बोळ्याने हा रस केसांच्या मुळांशी लावावा. अर्ध्या तासाने केस नेहमीप्रमाणे शाम्पूने धुऊन टाकावेत. कांद्याचा उग्र वास त्रासदायक वाटत असल्यास रसामध्ये थोडेसे गुलाबजल किंवा मध घालावा. कांद्यामध्ये असलेला सल्फर हा घटक केसांच्या मुळांशी होत असणारे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. परिणामी केस गळती कमी होऊन केसांचे आरोग्य सुधारते. कांद्याचा रस लावत असताना मात्र, हा रस डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी.

जास्वंद : जास्वंदीची फुले खोबरेल तेलामध्ये घालून, फुले काळसर होईपर्यंत तेल उकळून घ्यावे. तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे. हे तेल रोज रात्री केसांना लावून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवावेत. जास्वंदीमध्ये असणारी प्रथिने, phosphorous, रिबोफ्लाविन हे घटक दाट केसांच्या वाढीकरिता आवश्यक असतात. ह्या तेलाच्या वापरामुळे केसांचे अकाली पिकणे कमी होऊन, केस पुन्हा काळे होण्यास मदत होते.

कढीपत्ता : कढीपत्ता केसंकारिता tonic चे काम करीत असतो. कढीपत्ता तेलामध्ये उकळून घेऊन हे तेल केसांना लावल्यास केस गळती थांबते.

Leave a Comment