गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुनश्चः वाढ, 26 जणांचा मृत्यू, तर सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजारांच्या पुढे


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3962 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 26 रुग्णांचा मृत्यू झाला, जो कालच्या तुलनेत 16 अधिक आहे. काल 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या 24 तासांत 2,697 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22,416 वर गेली आहे, जी कालच्या तुलनेत 1,239 अधिक आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,24,677 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग वाढल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लिहिले राज्यांना पत्र
कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांना पत्र लिहून वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी खबरदारीची पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना दक्ष राहण्यास सांगितले आहे. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांत दिल्लीत आढळले कोरोनाचे 345 नवे रुग्ण
दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 345 नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात संसर्गाचे प्रमाण 1.88 टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी एकूण 18,334 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

IIT मुंबईमध्ये कोरोना संसर्गाची 30 प्रकरणे
IIT मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत किमान 30 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आयआयटीच्या प्रवक्त्याने शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत संस्थेमधील 30 लोकांना कोविड-19 महामारीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या सर्वांमध्ये साथीची सौम्य लक्षणे आहेत आणि या लोकांना वेगळे करण्यात आले आहे.