सुब्रमण्यम स्वामींचे आयपीएलवर प्रश्नचिन्ह : म्हणाले – फायनलमध्ये झाली हेराफेरी, गुप्तचर यंत्रणाही तेच मानते, चौकशी व्हायला हवी


नवी दिल्ली – भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे आपल्याच पक्षावर निशाणा साधत आहेत. आता स्वामींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) हल्लाबोल केला आहे. आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावर लिहिले, की गुप्तचर यंत्रणांना देखील विश्वास आहे की आयपीएलच्या निकालांमध्ये हेराफेरी झाली आहे. यासाठी तपास करणे आवश्यक आहे आणि तपासासाठी जनहित याचिका (पीआयएल) दाखल करणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर संजू सॅमसन
सुब्रमण्यम स्वामींच्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आता सोशल मीडिया यूजर्स बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्सला प्रश्न विचारत आहेत. एका वापरकर्त्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला टॅग करत लिहिले – प्रश्न असा आहे की नाणेफेक जिंकूनही संजू सॅमसनने अनपेक्षितपणे फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला?

गुजरातने 7 गडी राखून फायनल जिंकली
IPL 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य 18.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

या विजयानंतर गुजरातला बीसीसीआयकडून ट्रॉफीसह 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली. उपविजेत्या राजस्थानलाही 12.5 कोटी रुपये मिळाले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरूला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनौला 6.5 कोटींचे रोख पारितोषिक मिळाले.

चहलला पर्पल कॅप आणि बटलरला ऑरेंज कॅप
सर्वाधिक विकेट घेणारा राजस्थानच्या युजवेंद्र चहलला पर्पल कॅपसह 10 लाख रुपये मिळाले. चहलने या मोसमात 27 विकेट घेतल्या. त्याचवेळी या मोसमात सर्वाधिक धावा करणारा राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला ऑरेंज कॅपसह 10 लाख रुपये मिळाले. बटलरने 17 सामन्यात 863 धावा केल्या.