जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी केली एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या, काश्मिरी पंडित यांच्यानंतर बाहेरच्या व्यक्ती निशाण्यावर


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी दहशतवादी घटना समोर आली आहे. येथे दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून बँक मॅनेजरला गोळ्या घातल्या. व्यवस्थापकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे बडगामनंतर कुलगाममध्ये काश्मिरी पंडितांपाठोपाठ बिगर काश्मिरींनाही लक्ष्य केले जात आहे. गुरुवारी बँक मॅनेजरच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील आरेह गावात दहशतवादी एका बँकेत घुसले. यादरम्यान दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. दुसरीकडे बँक मॅनेजरला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

बँक मॅनेजर राजस्थानचा रहिवासी
कुलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बँक व्यवस्थापक विजय कुमार हे राजस्थानचे रहिवासी होते. स्थानिक देहाती बँकेचे कर्मचारी विजय कुमार यांना बँकेच्या आवारात गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.