देशात नाहीत राहुल गांधी, आज ईडीसमोर होणार नाहीत हजर


नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर असून, ते 5 जूनला मायदेशी परततील. राहुल गांधी दिल्लीत नसल्याची माहिती ईडीला देण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी 19 मे रोजी देश सोडून गेले होते. 20 ते 23 मे या कालावधीत लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून ते भारतात परतले नाही. राहुल गांधी 5 जूनपर्यंत मायदेशी परतण्याची शक्यता आहे. यानंतर ते मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी नवीन तारीख मागणार आहेत. या बहुचर्चित प्रकरणात चौकशीसाठी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 8 जून आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना २ जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

ईडीची नोटीस सोनिया-राहुल यांचे मनोबल कमी होणार नाही: काँग्रेस
ईडीच्या समन्सवर, काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले आहे की, ‘जेव्हा काँग्रेस इंग्रजांना आणि त्यांच्या अत्याचारांना घाबरत नाही, तर ईडीच्या नोटिसा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि पक्षाचे मनोबल कसे भंग करू शकतात? आम्ही जिंकू, आम्ही हार मानणार नाही. आम्ही घाबरणार नाही.

राजकीय हेतूने प्रेरित प्रकरणः अभिषेक मनु सिंघवी
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी बुधवारी मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. दोन्ही नेते ईडीसमोर हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांचा सामना करू. आम्ही अशा डावपेचांना घाबरत नाही किंवा घाबरणार नाही. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून त्यासाठी कोणत्याही चौकशीची गरज नाही. सुरजेवाला आणि सिंघवी यांनी पुष्टी केली की ईडीला पाहिजे, तेव्हा गांधी कुटुंब तपासात सामील होईल.

जर पैसे हस्तांतरित केले नाहीत तर मनी लाँड्रिंग कुठे आहे?
सिंघवी यांच्या मते, नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) द्वारे प्रकाशित केले जाते, जे कर्जात बुडाले होते. त्यानंतर अनेक दशकांमध्ये काँग्रेसने त्यात 90 कोटींची गुंतवणूक केली. भारतातील किंवा परदेशातील प्रत्येक कंपनी जे करते तेच AJL ने केले. कंपनीने आपले कर्ज इक्विटीमध्ये रूपांतरित केले. यानंतर 90 कोटी रुपयांची इक्विटी यंग इंडिया या नवीन कंपनीकडे सोपवण्यात आली. सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांचे यंग इंडियामध्ये वाटा आहे. यंग इंडिया ही ना-नफा कंपनी म्हणून नोंदणीकृत होती. या व्यवहारातून एजेएल ही कर्जमुक्त कंपनी बनली. एकही मालमत्ता आणि पैसा हस्तांतरित केला नाही, मग मनी लाँड्रिंग कुठे आहे? पैसा कुठे आहे? पैसे हस्तांतरित केले गेले नाहीत, तरीही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला.

राज्यसभा निवडणुकीची चर्चा, राहुल गांधी झाले सहभागी
दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने विचारमंथन केले. यामध्ये राहुल गांधीही व्हिडीओ काँफ्रेंसिंग द्वारे सहभागी झाल्याचे पक्षाच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.