सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केले आरोपपत्र


मुंबई : 100 कोटी रुपयांच्या कथित लाचप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने गुरुवारी हे आरोपपत्र दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एक दिवस अगोदर बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने बडतर्फ महाराष्ट्र पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्यास परवानगी दिली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य आरोपींविरुद्धच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात अधिकृत साक्षीदार होण्यासाठी वाजे यांनी याचिका दाखल केली होती. वाजे यांना 7 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वाजे आणि अनिल देशमुख हे दोघे अनुक्रमे एनआयए आणि ईडीने नोंदवलेल्या स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमधून स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयएने वाजे यांना अटक केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी लावलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी देशमुख यांच्यावर अनेक गैरकृत्यांचा आरोप केला होता. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी देशमुख यांनी सचिन वाजे यांच्यावर सोपवली होती.