जैन यांच्यानंतर आता सिसोदिया यांची पाळी : केजरीवाल यांनी केला मोठा दावा – सिसोदिया यांना देखील खोट्या प्रकरणात अकडवण्याची तयारी


नवी दिल्ली : सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता केंद्र सरकार दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेची सुरुवात करताना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला आठवत असेल की मी काही महिन्यांपूर्वी सर्वांना सांगितले होते की, सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात केंद्र सरकार अडकवणार आहे. मला अत्यंत विश्वासार्ह स्त्रोतांकडून याची माहिती मिळाली. काल याच सूत्रांकडून समजते की, आता मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने सर्व तपास यंत्रणांना काही खोट्या केसेस करण्यास सांगितले आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले, मनीष सिसोदिया हे देशातील शैक्षणिक क्रांतीचे जनक आणि कदाचित स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. पूर्वी गोरगरिबांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये तिसरीचे शिक्षण मिळायचे. दिल्लीतील शाळांमध्ये 18 लाख मुले शिकतात. या सर्वांचे भविष्य अंधारात होते, सिसोदियांनी त्यांच्या डोळ्यात भविष्याची सोनेरी स्वप्ने दिली आहेत. आई-वडिलांच्या डोळ्यात चमक आणली.

दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, आज मला त्या 18 लाख मुलांना विचारायचे आहे की तुमचे मनीष सिसोदिया भ्रष्ट आहेत का? मला त्या मुलांच्या पालकांना विचारायचे आहे की, हे लोक मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणत आहेत, ते असे आहेत का?