Singer KK Death: गायक केकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल, डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा


नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक केकेच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू मार्केट पोलिसांनी केकेच्या असामान्य मृत्यूची नोंद केली आहे. यानंतर आयोजक आणि हॉटेल कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. पोलिस त्यांची चौकशी करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत कोलकाता येथील लाईव्ह शोदरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर ते हॉटेलमध्ये जाऊन कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, आता केकेचा अनैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या.

हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा डोक्याला होती दुखापत
केके यांना रुग्णालयात नेले असता त्यांच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदनानंतरच या सर्व गोष्टींवर पडदा पडेल. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळानंतर एसएसकेएम रुग्णालयात त्यांचे पोस्टमॉर्टम सुरू होईल. माहितीनुसार, कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर चौकशी आणि शवविच्छेदन केले जाईल. केकेची पत्नी आणि मुलगा कोलकाता येथे पोहोचले आहेत.

अनेक भाषांमध्ये गायली होती गाणी
गायक केकेचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होते. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक, केके यांनी आपल्या आवाजात अनेक गाणी गायली आहेत. 23 ऑगस्ट 1970 रोजी जन्मलेल्या केकेने हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि तमिळ गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांचा गोड आवाज सर्वांच्या मनाला भिडला.