राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा श्रीमंत आहेत त्यांच्या पत्नी ! कोण आहेत महाराष्ट्रातील ते दोन नेते?


मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज करताना ही माहिती सार्वजनिक झाली आहे. भाजपचे गोयल यांच्याकडे 29 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांची पत्नी सीमा यांच्याकडे 50 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 14 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 34 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. गोयल आणि पटेल यांच्या संपत्तीत दरवर्षी झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सोमवारपर्यंत राज्यसभेसाठी एकूण 53 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, भाजपकडून पियुष गोयल, डॉ.अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 29 कोटी 8 लाख रुपये आणि पत्नी सीमा यांनी 50 कोटी 16 लाख रुपयांची जंगम मालमत्ता दिली आहे. गोयल यांच्या कुटुंबीयांकडे एकूण 49 लाख 60 हजार रुपयांची संपत्ती आहे.

पियुष गोयल यांची एकूण संपत्ती
गोयल यांच्याकडे 7 कोटी 27 लाख रुपये आणि पत्नीकडे 13 कोटी 31 लाख 90 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पीयूष गोयल यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर 1 लाख 25 हजार रुपये, तर त्यांची पत्नी सीमा यांच्यावर 14 कोटी 27 लाख रुपयांची देणी आहे. गोयल यांच्या उत्पन्नात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. 2020-21 मध्ये गोयल यांचे वार्षिक उत्पन्न 62 लाख 37 हजार रुपये आहे, तर 2019-20 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 37 लाख रुपये होते. 2018-19 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 33 लाख 17 हजार रुपये होते.

गोयल यांच्याकडे 3 लाख 71 हजार रुपयांची रोकड आहे. त्यांच्या बँक खात्यात 80 लाख 10 हजार 484 रुपये आहेत. PPF मध्ये 11 लाख 75 हजार आहेत. गोयल यांच्याकडे सोन्यासह इतर मौल्यवान वस्तू आहेत, ज्याची किंमत 3 कोटी 15 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे टोयोटा कंपनीची तीन वाहने असून, त्यांची किंमत 83 लाख 410 रुपये आहे.

प्रफुल्ल पटेल यांची पत्नीही श्रीमंत
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 14 कोटी 36 लाख आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 34 कोटी 12 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे 80 कोटी 3 लाख 14 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पटेल यांच्याकडे 75 कोटी 37 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता, त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडे 104 कोटी 56 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यांच्या कुटुंबीयांकडे 107 कोटी 66 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पटेल यांच्या पत्नी वर्षा यांच्यावर 4 कोटी 1 लाख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 10 कोटी 22 लाख रुपयांची देणी आहे.