बेपत्ता नेपाळी विमानाचे अवशेष सापडले, चार भारतीयांसह 22 जण होते विमानात, अनेकांचे मृतदेह ओळखणे कठीण


काठमांडू – खराब हवामानात, नेपाळच्या लष्कराने सोमवारी सकाळी मुस्तांग जिल्ह्यातील सनोसवेअर येथे बेपत्ता विमानाचे अवशेष शोधून काढले. स्थानिक तारा एअरलाइनचे छोटे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले आहे. या विमानात चार भारतीय नागरिकांसह एकूण 22 जण होते. नेपाळच्या ‘तारा एअर’च्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने पोखरा येथून सकाळी 09.55 वाजता उड्डाण केले होते.

नेपाळचे पोलिस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तमांग म्हणाले की, काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण आहे. सोमवारी सकाळी नेपाळी लष्कराला विमान ज्या ठिकाणी कोसळले, ते ठिकाण शोधून काढले आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विटमध्ये सांगितले की, मदत आणि बचाव पथकांनी विमानाच्या अपघातस्थळाचा शोध घेतला आहे. तारा एअरचे 9 NAET दुहेरी इंजिन असलेले विमान रविवारी पहारी जिल्ह्यात बेपत्ता झाल्यानंतर काही तासांतच मुस्तांग जिल्ह्यातील कोवांग गावात कोसळले होते.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोखरा ते जोमसोम हे दोन इंजिन असलेले विमान मुस्तांगच्या लेटे भागात पोहोचल्यानंतर रविवारी सकाळी 9.55 वाजता संपर्क तुटला. जिल्हा पोलिस कार्यालयाचे डीएसपी राम कुमार दाणी यांनी एएनआयला सांगितले की टिटीच्या स्थानिक लोकांनी आम्हाला कॉल केला आणि आम्हाला सांगितले की स्फोट झाल्यासारखा असामान्य आवाज ऐकू आला आहे.

लामचे नदीकाठावर कोसळले विमान
स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे हे विमान लामचे नदीजवळ कोसळले. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, काल बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आलेली शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रविवारी मुस्तांग जिल्ह्यात बर्फवृष्टीमुळे विमानाच्या शोधात गुंतलेली सर्व हेलिकॉप्टर परत बोलावण्यात आली.

कॅप्टनचा फोन केला ट्रॅक
विशेष बाब म्हणजे विमानाच्या पायलटचा फोन ट्रॅक करून विमानाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आहे. नेपाळ टेलिकॉमने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) नेटवर्कद्वारे पायलट कॅप्टन प्रभाकर घिमिरे यांचा फोन ट्रॅक केला होता.

विमानात होते चार भारतीय प्रवासी
एअरलाइनचे प्रवक्ते सुदर्शन बारतुला यांनी सांगितले की, बेपत्ता विमानात चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिक होते. याशिवाय विमानात तीन नेपाळी क्रू मेंबरही होते. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी या चार भारतीय नागरिकांची नावे आहेत. हे विमान सकाळी 10.15 वाजता जोमसोम विमानतळावर पोहोचणार होते.