मुले म्हणजे देवाघरची फुले आणि देशाचे भावी आधारस्तंभ अशी वाक्ये आपण नित्य ऐकत असतो. परंतु आपल्या देशातली मुले आनंदी आहेत का आणि त्यांना मिळणारी वागणूक त्यांच्या प्रगतीस अनुकूल ठरावी अशी आहे का याचा शोध घेतला असता आपल्या देशाची ही भावी पिढी म्हणावी तेवढी मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याचे दिसते. नागपूरमध्ये परीक्षांच्या काळामध्ये काही मुलांच्या चाचण्या घेतल्या असत्या ५० टक्के मुलांनी घरातून पळून जावेसे वाटते असे स्पष्टपणे सांगितले. परीक्षांचा ससेमिरा, स्पर्धेच्या युगाची निष्कारण दाखवली जाणारी भीती आणि स्वतःच्या भवितव्याविषयी मनात असलेली अनिश्चितता याचा परिणाम होऊन ही मुले आयुष्याला कंटाळलेली आहेत हे दिसून आले आहे. ही गोष्ट फार चिंता करायला लावणारी आहे.
लहान मुलांमधील अस्वस्थता
वास्तविक पाहता नागपूरमध्ये केली गेलेली ही पाहणी त्या दृष्टीने केलेली नव्हती. तर विद्यार्थ्यांना आपला उच्च शिक्षणाचा मार्ग निवडता यावा यासाठी घेतलेली ती कलचाचणी होती. त्या चाचणीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना या मुलांनी ही व्यथा व्यक्त केली. आपल्या देशात शेतकर्यांच्या आत्महत्यांवर खूप चर्चा होते पण विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांवर अशी चर्चा होत नाही पण प्रत्यक्षात आपल्या देशात विद्यार्थीसुध्दा मोठ्या संख्येने आत्महत्या करायला लागले आहेत. जीवनातल्या कठीण प्रसंगांना आणि अडचणींना तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थीसुध्दा आत्महत्यांचा मार्ग अवलंबत आहेत. खरे म्हणजे आपल्या देशातल्या शिक्षणाचा हा पराभव आहे.
२०१० ते २०१५ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्यांची संख्या वाढलेली दिसली आहे. आत्महत्या करणार्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधली असता तीसुध्दा परीक्षा आणि आईबापांच्या दबावामुळे आलेले नैराश्य यांच्याशीच संबंधित असल्याचे लक्षात येते. यातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मरणापूर्वी आपल्या भावना आपल्या मित्राजवळ व्यक्त केेलेल्या असतात आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. तिच्यामध्ये प्रामुख्याने आईवडिलांनाच संबोधित केलेले असते. आईबाबा मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते. यातून घ्यावयाचा बोध एवढाच की आईवडिलांनी आपल्या मुलांवर डॉक्टर किंवा इंजिनिअरच होण्याचा दबाव आणता कामा नये.