बहुतेक कार्यालयांमध्ये दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि घरून आणलेल्या लंचबॉक्समधील अन्न पोटात पडले की ते खाणार्यांना झोप यायला लागते. जे लोक घरी बसलेले असतात किंवा व्यापार करतात त्यांनाही दुपारच्या जेवणानंतर सुरसुरी यायला लागते. मात्र त्यांना या जेवणानंतर वामकुक्षी घेण्याची सोय असते. तशी सोय कर्मचारी बांधवांना आणि भगिनींना नसते. त्यामुळे लंच अवर नंतर सुरसुरी तरी येते पण एखादी डुलकी घेण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सुरसुरीची भावना तशीच घेऊन ते कामही करायला लागतात आणि कामाचा वेग मात्र वाढत नाही. तेव्हा लंचनंतर झोप का येते याचा शोध घेतला पाहिजे. सामान्य माणसाच्या अशा आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या की त्यावर संशोधक काहीतरी संशोधन करतातच आणि त्यातून शास्त्रीय निष्कर्ष हाती आल्याशिवाय राहत नाहीत.
दुपारच्या जेवणानंतरची सुरसुरी
शास्त्रज्ञांच्या मते लंचनंतर सर्वांनाच सुरसुरी येत नाही. विशेषतः जे लोक आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न खातात त्यांना हमखास सुरसुरी येते. म्हणजे लंचनंतरचा आळस हा मर्यादेपक्षा अधिक खाण्याचा परिणाम आहे. जास्त अन्न खाल्ले गेले की आपल्या पॅन्क्रियाजमध्ये म्हणजे स्वादूपिंडामध्ये त्याचे शेवटी शर्करेत रूपांतर होते. अन्न जास्त खाल्ले असेल तर शर्करा अधिक तयार होते. त्यातून दोन परिणाम होतात. एक तर रक्तातील शुगर वाढते आणि दुसरे म्हणजे झोप आणणारे काही हार्मोन्स तयार होतात आणि हे जादा हार्मोन्स माणसाला झोप आणतात. या प्रक्र्रियेमध्ये दोन प्रकारचे झोपेचे हार्मोन्स तयार होतात. सिरोटोनीन आणि मेलॅटोनीन. त्यातील मेलॅटोनीन हे हार्मोन झोप आणणारे आहे.
आपण जास्त जेवण केले की ते पचन करण्यासाठी मोठी शक्ती पणाला लावावी लागते. शरीरामध्ये शक्ती पणाला लावायची वेळ आली की रक्तप्रवाह वाढवावा लागतो. म्हणजे आपल्याला जास्त अन्न पचन करण्याची गरज निर्माण झाली की शरीराची ६५ ते ७० टक्के क्षमता अन्नपचन करण्याच्या कामात लागते. म्हणजे हृदयाला एक संदेश पोहोचतो की आता पोटाकडे जरा जास्त रक्त पाठवण्याची गरज आहे. मग तो संदेश मिळाल्यानंतर हृदय जठराकडचा रक्तपुरवठा वाढवते आणि तसा तो वाढवताना दुसर्या अवयवाकडील रक्तपुरवठा कमी करते. मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे माणसाला झोप यायला लागते. तेव्हा दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये असे वाटत असेल तर जेवण कमी करावे.