जाणून घ्या लंच विवेक


आरोग्याचे लक्षण आहारातून करण्याचा विषय समोर येतो तेव्हा आहारविषयक टिप्स् देताना बे्रकफास्टची फार चर्चा होते. ब्रेकफास्ट कसा आवश्यक असतो, ब्रेकफास्टमध्ये काय काय खावे आणि काय काय खाऊ नये यावर भरपूर मार्गदर्शन केले जाते. या सगळ्या गोष्टी वजन सांभाळण्यासाठी कशा महत्त्वाच्या आहेत हे सांगितले जाते. परंतु वजन कमी करणे आणि आहे ते टिकवणे या दोन्ही गोष्टींसाठी ब्रेकफास्ट इतकेच लंचलाही महत्त्व आहे आणि लंच हेसुध्दा आरोग्याच्या दृष्टीने कसे घ्यावे हे समजून घेणे आवश्यक आहे. लंचच्या बाबतीत होणारी एक मोठी चूक म्हणजे ते वेळेवर घेतले जात नाही. सकाळी भरपूर ब्रेकफास्ट केलेला असेल आणि लंचच्या आधी काही खाणे झाले असेल तर लवकर भूक लागत नाही.

किंबहुना ती लागली तरी भुकेची तीव्र जाणीव होईपर्यंत आपण लंच घेत नाही. बहुतेक कार्यालयांमधून लंच टाईम ठरलेला असतो. परंतु जे लोक कार्यालयात काम करत नाहीत ते दोन-अडीचपर्यंत लंच घेतच नाहीत. कधी कधी त्यांना सवड मिळत नाही म्हणून लंच लांबते तर काही वेळा भुकेची तीव्र जाणीव होत नाही म्हणून तीनपर्यंतही लंच घेतले जात नाही. परिणामी ऍसिडीटी वाढते आणि खाण्यापिण्याचे वेळापत्रक बिघडून जाते. काही वेळा लंचला सवड मिळत नाही. त्यामुळे काम करत करत थोडेसे काहीतरी खाऊन लंच लांबवले जाते आणि हे थोडे खाणे वडापाव, समोसा, भजे, पकोडे अशा त्याज्य खाद्यपदार्थांच्या स्वरूपातच असते. परिणामी पोटावर अन्याय होतो आणि तासाभराने पुन्हा लंच घ्यायला बसलो तरी उत्साहाने खाणे जात नाही.

तेव्हा लंचला पर्याय म्हणून अरबट चरबट काही खाऊ नये. तसेच लंचमधले खाणे शक्यतो घरचेच असावे. बाहेरचे हॉटेलचे लंच पोटाला त्रासदायक ठरते. शिवाय घरून आणलेले हे डब्यातले अन्न शांतचित्ताने आणि सावकाशीने खाल्ले पाहिजे. तरच ते अंगी लागते. हे दुपारचे खाणे चौरस असले पाहिजे. विशेषतः त्या खाण्यात प्रोटीनचे प्रमाण चांगले असावे. त्यामध्ये भरपूर फायबर्स असावेत. जेवण करताना शेंगादाणे, कांदा, मुळा, गाजर, बीट असे रॉ खाणे जरूर असावे. दुपारच्या खाण्यानंतर एक ग्लासभर ताक किंवा छोटा ग्लासभरून फळांचा रस घेता आला तर तो जरूर घ्यावा. मात्र दुपारच्या या खाण्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. किंबहुना ते नही के बराबर असे असावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment