कुकुटपालन करून नेमके किती मिळते उत्पन्न?


आपल्या देशामध्ये लोकांचे राहणीमान वाढत चालले आहे. ते जस जसे वाढत जाईल तस तसे त्यांचे खाणे-पिणे सुधारत जाणार आहे आणि त्यांच्या हातात पैसा यायला लागला की, तो पैसा चांगल्या खाण्या-पिण्यावर खर्च होणार आहे हे नक्की. त्यामुळे कुकुटपालन व्यवसायाला खूप वाव आहे. चिकन आणि अंडी यांची मागणी वाढत जाणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून कोंबड्यांची अंडी आणि मांसल कोंबड्या यांची मागणी सातत्याने वाढत चालल्यामुळे अंड्याच्या उत्पादनात साडेपाच टक्के तर कोंबड्यांच्या उत्पादनात साडेबारा टक्के वाढ झालेली आहे.

सध्या भारतात १५ लाखांपेक्षाही जास्त लोक कोंबड्या पाळण्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. परंतु शेळी पालन आणि कोंबडी पालन या दोन व्यवसायामध्ये एक छोटासा फरक आहे. शेळी पालनात प्रामुख्याने शेळी किंवा बोकडच विकला जातो आणि हा विक्रीचा व्यवहार अधूनमधून करावा लागतो. मात्र कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये अंड्यांची विक्री दररोज करावी लागते. म्हणजे हा विक्री व्यवहार रोजचा व्यवहार असतो. कोंबड्या पाळताना कोंबड्यांचे रोग, त्यांची औषधे आणि उपचार यावर शेळ्यांपेक्षा थोडे जास्त लक्ष द्यावे लागते. भारतामध्ये अजूनही दरमहा सरासरी दरडोई ६०० ग्रॅम मांस खाल्ले जाते. दरवर्षी भारतात दरमाणशी ३६ अंडी खाल्ली जातात. पण याबाबतीत जगाची सरासरी १५० अंडी एवढे आहे. शहरांमध्ये अंडी आणि मांस विकणे सोपे असल्यामुळे जे काही थोडे लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत ते मांस विक्रीची आणि अंडी विक्रीची सेवा प्रामुख्याने शहरामध्येच पुरवताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातले मांसाचे मार्केट अजून म्हणावे तसे वापरले गेलेले नाही.
(व्हिडिओ सौजन्य – दूरदर्शन)

या व्यवसायात पडण्याची इच्छा ज्यांना असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या तालुक्याच्या ठिकाणी कुक्कुट पालनाचे अभ्यासक्रम होत असतात, त्या अभ्यासक्रमांना जरूर प्रवेश घ्यावा. अभ्यासक्रम कोठे आणि कसे भरवले जातात याची माहिती अनेकदा वृत्तपत्रात सुद्धा छापून येत असते. तिच्यावर लक्ष ठेवावे आणि या अधिक माहिती हवी असल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या पशु संवर्धन अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. काही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे.
(व्हिडिओ सौजन्य – साम टीव्ही)

Leave a Comment