मद्याचे आणखी एक दुष्परिणाम


मद्याचे शरीरावर होणारे परिणाम आता सर्वज्ञात आहेत. परंतु चांगली झोप यावी म्हणून काही चिंताग्रस्त लोक एक दोन पेग घेऊनच मग झोपी जातात. त्यांना पटकन झोप येत नसल्यामुळे मद्य पिऊन झोपायची सवय लागते. कारण मद्य प्यायल्याने त्यांना लवकर झोप यायला लागते. असा त्यांचा अनुभव असतो. वरकरणी असे दिसत असले तरी मद्य पिऊन झोपणार्‍या लोकांच्या झोपण्याच्या प्रक्रियेवर आणि एकूणच आरोग्यावर मद्याचे फार गंभीर परिणाम होत असते. मद्य प्राशन करण्याने पटकन झोप लागते आणि ती फार घातक असते. सामान्यतः नैसर्गिकरित्या झोपणार्‍या व्यक्तीच्या आठ तासाच्या झोपेमध्ये दोन-तीन अवस्था असतात आणि त्या क्रमाक्रमानेच प्राप्त होऊन झोप पूर्ण होत असते.

परंतु दारू प्राशन करून झोपणार्‍या माणसाला दारू पिल्याबरोबर एकदम गाढ झोप लागते आणि नंतरचे काही तास तो बेहोशीत असतो. ती झोप नसते. दारू प्यायल्याने शरीराच्या स्नायूंना हलकेपणा येतो. विशेषतः जेव्हा घशातले स्नायू असे हलके झालेले असतात तेव्हा जर झोप लागली तर असा झोपणारा माणूस जास्त घोरायला लागतो. काही काही लोक तर अशा अवस्थेत बडबड करतात आणि काही लोक तर उठून चालायला लागतात. कारण ती खर्‍या अर्थाने झोप नसते तर बेहोशी आणि जागृती या मधली एक अवस्था असते. दारू प्यायल्याने शांत झोप लागते असे लोक समजतात पण तो त्यांचा गैरसमज आहे.

मद्य प्राशन करून झोपणार्‍यांची मज्जासंस्था उलट जास्त सक्रीय होते आणि हृदयाच्या स्पंदनांचा वेग वाढतो. त्याचाच परिणाम होऊन रक्तदाब वाढतो. अशा अवस्थेत जी व्यक्ती झोप घेते तिच्यावर एक प्रकारचा तणाव राहतो आणि त्याच तणावात तिचा पूर्ण दिनक्रम पार पडतो. झोपताना घेतलेले मद्य मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करते. व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन मद्याने बंद होते. जे हार्मोन मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. शरीरातील पाणी ओढून घेऊन त्याचे शुध्दिकरण करण्याची प्रक्रिया या हार्मोनमुळे संतुलीत राहत असते. परंतु तेच निर्माण झाले नाही तर ही प्रक्र्रिया असंतुलीत होते आणि तिचा लघवीवर परिणाम होतो. दारू पिऊन झोपणारा माणूस जेव्हा सकाळी उठतो तेव्हा बराच थकलेला जाणवतो आणि विशेषतः त्याच्या शरीरातल्या पाण्याचा सारा समतोल बिघडल्यामुळे डीहायड्रेशन होते आणि थकल्यासारखाा कामे करायला लागतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment