व्यायामाचेही व्यसन नको


शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी आणि मन मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यकच आहे. व्यायामाच्या गरजेबाबत कोणाचेच दुमत होणार नाही. परंतु काही मानसशास्त्रज्ञ व्यायामाच्या बाबतीत एक इशारा देत आहेत की व्यायाम करा पण व्यायामाचे व्यसन लावून घेऊ नका. व्यायामाच्या अनावश्यक आहारी जावू नका. दारू पिणारा माणूस जसा ऍडिक्ट होण्याची शक्यता असते तसेच व्यायाम करणाराही व्यायामाच्या बाबतीत ऍडिक्ट होण्याची भिती असते आणि म्हणून आपण व्यायाम करत आहोत की नाही हे तर पहाच पण आपण व्यायामाच्या बाबतीत व्यसन लावून घेत आहोत की काय यावरही लक्ष ठेवा, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शरीर तंदुरूस्त असले पाहिजेच परंतु आपल्या दिवसातले सारे रुटीन केवळ त्यासाठीच्या व्यायामाच्या भोवती गुंफले जात असेल तर हा धोका संभवतो.

जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरातून एन्डॉर्फिन आणि सेरेटोनिन ही दोन द्रव्ये पाझरत असतात. त्यांचा उपयोग आपल्याला होत असतो. एन्डॉर्फिनमुळे मानसिक डिप्रेशन कमी होते तर सेरेटोनिनमुळे मनावरचा ताण कमी होतो. मात्र आपण या स्थितीच्या आहारी गेलो तर आपल्या स्नायूंमध्ये काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर व्यायाम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी स्थिती निर्माण होऊन एखादादिवस व्यायाम बुडत असेल तर त्या दिवशीच्या त्या भावनेपोटी काही शारीरिक कटकटीही निर्माण होत असतात. तेव्हा एखादादिवस व्यायाम केला नाही तर फार मोठे नुकसान होईल ही भावना मनातून काढली पाहिजे. व्यायामातून निर्माण होणारी शरीराची तंदुरूस्ती ही स्वागतार्हच असते. परंतु आपल्या आयुष्याला परिपूर्णता येण्यासाठी एवढी एकच गोष्ट आवश्यक नाही.

व्यायामसुध्दा मोजकाच आणि नेमकाच करावा. परंतु काही लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की जितका जास्त वेळ व्यायाम तेवढे आरोग्य उत्तम. वास्तविक हा गैरसमज आहे. शरीरसुध्दा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तंदुरूस्त होत असते. त्या मर्यादेपर्यंत शरीर मजबूत होण्यासाठी जेवढा व्यायाम आवश्यक आहे तेवढाच व्यायाम केला पाहिजे. उगाच फार मोठी बॉडीबिल्डिंग होईल म्हणून अधिकाधिक जीममध्ये काढायला लागलो तर त्याचा फायदा तर होत नाहीच पण जीममधला तो अनावश्यक वेळ वाया जातो. ज्याचा इतर कामांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment