वनस्पतींचे अज्ञात उपयोग


काही सामान्य वनस्पती आपल्या अवतीभवतीच असतात परंतु त्यांचे योग्य ते आणि अज्ञात असे फायदे आपण जाणत नाही. मात्र जुन्या काळापासून ते आपल्याला वारंवार सांगितले गेलेले आहेत. त्यांचा विसर आपल्याला पडला आहे आणि आपण विनाकारण रसायनयुक्त कृत्रिम औषधांच्या मागे लागलो आहोत. काही वनस्पतींची तेले केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारावर उपयुुक्त ठरतात असे परंपरेने दिसून आले आहे. आता मात्र या वनस्पतीचा वापर वाढत चालला आहे आणि त्यांच्या उपचारांची लोकप्रियताही वाढत आहे. पेपरमिंट ही वनस्पती सर्वांना माहीत आहे. जिला मराठीत पुदिना असे म्हणतात. तिचा उपयोग अती थकव्याशी सामना करण्यासाठी होतो. पुदिन्याची पाने चटणी किंवा चाटण आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरू शकतात.

पुदिन्याची पाने ठेचून ती चघळली तरीसुध्दा स्मरणशक्ती तेज बनू शकते. विस्मरणाचे अनेक रोग पुदिन्यामुळे दुरूस्त होऊ शकतात. आपल्या दारामध्ये असणारी साधी वनस्पती म्हणजे तुळस. तुळशीचे रोप ज्याच्या घरासमोर नसेल असे हिंदू कुटुंब सापडणे कठीण. परंतु आपण तुळशीकडे धार्मिक भावनेने पाहतो. वास्तविक तुळस ही फार परिणामकारक औषधी वनस्पती आहे. तुळशीची पाने चघळल्याने एकाग्रता वाढते. काही वेळा आपल्याला मानसिक थकवा येतो आणि आपल्यासमोर मनाला आणखीन थकवा आणणारे काही प्रश्‍न उभे असतात. अशावेळी तुळशीची पाने चघळल्यास मानसिक थकवा जातो आणि समोरच्या समस्या सोडवण्यास उत्तेजना मिळते.

अनेकदा परीक्षेला बसणारे विद्यार्थी पाठ केलेला अभ्यासक्रम एकदम विसरून जातात. डोक्यात अनेक प्रश्‍नांचा गोंधळ झाल्यामुळे समोरच्या प्रश्‍नाचे नेमके उत्तरच त्यांना आठवत नाही. अशा समस्येला आजकालची मुले ऑफ होणे असा शब्द वापरतात. अशा ऑफ होणार्‍या मुलांनी आपल्या कंपासमध्ये कायम तुळशीची पाने ठेवावीत आणि ती ऑफ होण्याचा धोका जाणवायलाा लागताच तोंडात टाकून चघळावीत. हा इलाज बर्‍याच जुन्या काळापासून विद्यार्थ्यांना सांगितला जातो. मात्र त्याचा आता विसर पडला आहे. स्मरणशक्ती तेज बनवणारी काही औषधे आता बाजारात आली आहेत. त्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. प्रत्यक्षात अशा औषधांची गरज नाही. तुळशीची पाने अशा औषधांना पर्याय म्हणून वापरता येऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment