मलावरोध टाळण्यासाठी…


सध्याच्या आपल्या घाईघडबडीच्या जीवनशैलीचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. मधूमेह, रक्तदाब, हृदयविकार, ऍसिडिटी हे सगळे या जीवनशैलीचेच परिणाम आहेत. तिचा आणखी एक परिणाम म्हणजे मलावरोध. पोट साफ न होणे. खाण्यापिण्याच्या वेळा न पाळण्याने व जड अन्न खाल्ल्याने मलावरोध होतो. रोज उठल्यानंतर पोट साफ होण्याच्या ऐवजी ते गच्च होते आणि माणूस अस्वस्थ होऊन जातो. त्याच्या हालचालीवर मर्यादा येतात आणि मन बेचैन होते. मलावरोध टाळण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतली जातात. मात्र त्या औषधांचा तेवढ्यापुरताच उपयोग होतो. म्हणून काही डॉक्टर मंडळी आहारामध्येच असा बदल करण्याची शिफारस करतात की ज्या आहारामुळे मलावरोधाचा प्रश्‍न कायमचा सुटावा अशा आहारातल्या बदलाचे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत.

मलावरोध टाळण्यासाठी आणि शौचाला साफ होण्यासाठी फायबरयुक्त अन्न खाण्याची शिफारस केली जाते. मांसाहारामध्ये असे फायबर कमी असतात आणि म्हणूनच मांसाहार करणार्‍यांना मलावरोध जास्त सतावत राहतो आणि त्यातून आतड्याचा कर्करोग उद्भवण्याची भीती असते. म्हणून डॉक्टर शाकाहारावर भर देतात. खालील फळांचे सेवन केल्याने अन्नातील फायबरचे प्रमाण वाढू शकते. त्यातील पहिले फळ आहे सफरचंद. सफरचंदाचे इतर अनेक गुणधर्म लोकांना माहीत आहेत. परंतु प्रत्येक सफरचंदामध्ये साधारण साडेचार ग्रॅम फायबर्स असतात. म्हणूनच सफरचंद खाल्ल्याने पोट साफ होते. याबाबतीत त्याच्या खालोखाल गुणकारी असणारे फळ म्हणजे संत्रे. संत्र्यात म्हणजे प्रत्येक फळात चार ग्रॅम फायबर्स असतात.

संत्रे खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे त्यामध्ये कमी उष्मांक असतात. शेवग्याच्या शेंगा नुसत्या उकडून खाल्ल्या तर त्या पोट साफ होण्यास फार उपयुक्त ठरतात. रोज सकाळी एक कपभर ओटस् प्राशन केल्यास शौचाची क्रिया सुलभ होते. कारण त्यामध्ये दोन टक्के फायबर्स विद्र्राव्य आणि अविद्राव्य अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतात. कोरफड ही वनस्पती ही आता इतकी लोकप्रिय झाले आहे आणि तिचे गुणधर्म इतके व्यापक असल्याचे लक्षात आले आहे की सुशिक्षित लोकही कोरफडीचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करतच आहेत. ही कोरफड केस आणि त्वचेसाठी जशी गुणकारी आहे तशीच ती औषधी स्वरूपात प्राशन केल्यास पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment