वॉटर प्रिंट तपासा


आपण एक कप चहा पितो पण त्यासाठी किती पाणी वापरले जाते असा प्रश्‍न केला तर त्याचे उत्तर कोणीही अगदी सहजतेने देईल. एक कप चहासाठी फारतर कपभर पाणी लागेल. पण एक कप चहासाठी अप्रत्यक्षपणे ७० लीटर पाणी लागते याचा कोणी विचारच करीत नाही. एक कप चहाला अर्धा कप दूध, चमचा दोन चमचे साखर, चहाची पावडर लागते आणि ही सारी सामुग्री तयार करायला ७० लीटर पाणी लागत असते. अर्थात एवढा खोलवर कोणी विचार करीत नाही. आजवर कोणी असा विचार केला नसला तरी यापुढच्या काळात तो करावा लागणार आहे. कारण येत्या २०५० साली भारताची लोकसंख्या १६० कोटी होणार आहे. संख्या वाढली तरी पाणी आहे तेवढेच राहणार आहे. त्यामुळेच आपल्याला असा विचार करून पाण्याबरोबर अन्नही जपून,विचारपूर्वक वापरावे लागणार आहे.

शाकाहार चांगला की मांसाहार चांगला असा वाद नेहमी होत असतो. मांसाहारी लोक आपल्या आहाराचे समर्थन करताना, आपण मांसाहार करतो म्हणून सर्वांना धान्य पुरते असा युक्तिवाद करीत असतात. आपणही शाकाहार केला असता तर धान्याचा तुटवडा झाला असता असे त्यांचे म्हणणे असते. पण त्यांनी केवळ वरकरणी विचार केलेला असतो. मांसाहारी लोक अंडी खातात पण अंडी देणारी कोंबडी आपल्या आयुष्यात खाद्यातून किती किलो मका खात असते याची त्यांना जाणीव नसते. असाच हिशेब पाण्याचाही मांडला जात असतो. धान्याला, भाज्यांना खूप पाणी लागते. तसे ते कोंबड्या आणि दुभत्या जनावरांना लागत नाही असे मांसाहारींचे म्हणणे असते पण, मटणाला पाणी लागत नसले तरीही मटण देणारा बोकड त्याच्या जन्मात किती पाणी पीतो याचा हिशेब घातला पाहिजे.

तो एक हजार लीटर पाणी पीतो आणि १५ ते २० किलो मटण देतो. आता आपल्याला असे अन्न खावे लागणार आहे की ज्याला जादा पाणी लागत नाही. शास्त्रज्ञांनी याबाबत असा इशारा दिला आहे की, पृथ्वीला पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून वाचवायचे असेल तर आपल्याला आपला आहार बदलावा लागणार आहे. गहू, अंडी. मटण यांना फार पाणी लागते म्हणून त्यांचे सेवन कमी केले पाहिजे आणि ज्यांना कमी पाणी लागते ती फळे म्हणजे द्राक्ष, टरबूज, लिंबू यांचा वापर वाढवावा लागेल. आहारातला हा बदल केल्यास शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर खाली यायला मदत लागेल. तेव्हा आपल्याला आता कोणताही पदार्थ खाताना त्याला किती पाणी लागले असेल याचा हिशेब आधी घालण्याची सवय लावूून घ्यावी लागणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment